बंगाली अभिनेते अभिषेक चॅटर्जी यांचे निधन, ममता बॅनर्जींनी व्यक्त केलं दु:ख | पुढारी

बंगाली अभिनेते अभिषेक चॅटर्जी यांचे निधन, ममता बॅनर्जींनी व्यक्त केलं दु:ख

कोलकाता : पुढारी ऑनलाईन

बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अभिषेक चॅटर्जी यांचे निधन झाले आहे. अभिषेक चॅटर्जी ५७ वर्षांचे होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेक गेल्या काही दिवसांपासून खूप आजारी होते. मात्र, त्यांच्या मृत्यूचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. अभिषेक चॅटर्जी यांची २३ मार्च रोजी एका शोचे शूटिंग करत असताना अचानक तब्येत बिघडली होती. ते शूटिंग सेटवर अनेक वेळा पडले. त्यानंतर शोच्या क्रू मेंबर्सनी त्यांची काळजी घेतली.

शोच्या सेटवर तब्येत बिघडली

एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या रिपोर्टनुसार, असे म्हटले जात आहे की, अभिषेक चॅटर्जी आजारी असूनही त्यांची हॉस्पिटलमध्ये जाण्याची इच्छा नव्हती. ते सेटवरून घरी गेले. यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांना बोलावून अभिषेकवर उपचार केले. त्यावेळी त्यांना बरे वाटत होते. पण नंतर रात्री त्याची तब्येत बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला.

बंगाली चित्रपटसृष्टीतील अनेक हिट चित्रपटांचा भाग असलेले अभिषेक सध्या बंगाली टीव्ही शो खोरकुटोमध्ये काम करत होते. या शोमध्ये त्यांच्यासोबत तृना साहा आणि कौशिक रॉय यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. अभिषेक यांच्या आकस्मिक निधनामुळे बंगाली चित्रपटसृष्टी तसेच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

त्याचवेळी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही अभिषेक चॅटर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ममता बॅनर्जी यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे- अभिषेक यांच्या आकस्मिक निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. अभिषेक अतिशय हुशार आणि त्यांची अष्टपैलू कामगिरी होती. आम्हाला त्यांची खूप आठवण येऊल. त्यांच्या जाण्याने टीव्ही इंडस्ट्री आणि आपल्या फिल्म इंडस्ट्रीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे कुटुंब आणि मित्रांप्रती माझ्या संवेदना.

अभिषेक यांनी 1986 मध्ये आलेल्या ‘पाथबोला’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मजुमदार यांनी केले होते. अभिषेकने उत्पल दत्त, संध्या रॉय, प्रोसेनजीत चॅटर्जी आणि तपस पॉल यांसारख्या बंगाली चित्रपटसृष्टीतील मोठ्या नावांसोबत काम केले होते. चित्रपटांसोबतच बंगाली टीव्ही इंडस्ट्रीतही त्यांचे नाव प्रसिध्द होते.

Back to top button