sher shivraj : प्रतापगडाची पराक्रमी गाथा शेर शिवराजमध्ये | पुढारी

sher shivraj : प्रतापगडाची पराक्रमी गाथा शेर शिवराजमध्ये

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवचरित्रातील ‘अफझलखान वध’ या शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा अध्याय आहे. ज्यामुळं खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना झाली असं आपण म्हणू शकतो. आता हाच ऐतिहासिक सुवर्णअध्याय २२ एप्रिलला रुपेरी पडद्यावर येणार आहे. शेर शिवराज (sher shivraj) या चित्रपटाचे आकर्षक पोस्टर आणि पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. (sher shivraj)

त्या काळी विजापूरच्या दरबारात ‘मै लाऊंगा शिवाजी को…! जिंदा या मुर्दा!’, अशी वल्गना करत अफझलखानाने शिवरायांना जिवंत वा मृत घेऊन येण्याचा विडा उचलला होता. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी अफझलखान वधाचा चित्तथरारक अनुभव ‘शेर शिवराज’ या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर आणणार आहेत. निर्माते नितीन केणी, प्रद्योत प्रशांत पेंढरकर, अनिल नारायणराव वरखडे आणि चिन्मय मांडलेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या यशानंतर ‘शेर शिवराज’ २२ एप्रिल रिलीज होणार आहे.

दिग्पाल लांजेकर यांनी याआधी ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘शेर शिवराज’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध कसा केला? हे पहायला मिळणार आहे. प्रतापगड आणि अफझलखान यांचा खूप जवळचा संबंध आहे. राजांना जेरबंद करण्याच्या उद्देशानं भला मोठा फौजफाटा घेऊन सर्व तयारीनिशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचला. पण पुन्हा माघारी जाऊ शकला नाही. तिथेच त्याची कबर खोदली गेली. कारण खानाला शिवरायांच्या युद्धनीतीची, बुद्धीचातुर्याची, गनिमी काव्याची यासोबतच संयम, शिष्टाई आणि चतुराई या गुणांची जराही कल्पना नव्हती.

शिवरायांच्या याच अद्भुत गुणांचं आणि अनोख्या युद्ध कौशल्याचं दर्शन ‘शेर शिवराज’ या चित्रपटात दिसणार आहे. यासोबतच त्या काळातील सामाजिक, राजकीय वातावरण, राजांच्या अचूक निर्णयांचा रयतेला होणारा फायदा, शत्रूंची आक्रमणं परतवून लावण्याची शक्ती, अफझलखानाची स्वारी, खानाचा वध करत विजापूरी साम्राज्याला राजांनी लावलेला सुरुंग आणि त्यामुळं हादरलेल्या आदिलशाहीचं चित्रण ‘शेर शिवराज’ मध्ये दिसणार आहे.

Back to top button