हिंगोली ते कनेरगाव मार्गावर कारची दुचाकीला धडक, एक जण ठार | पुढारी

हिंगोली ते कनेरगाव मार्गावर कारची दुचाकीला धडक, एक जण ठार

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : हिंगोली ते कनेरगाव मार्गावर कार चालकाने त्याची कार निष्काळजीपणे वेगात पाठीमागे घेऊन दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एकजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात (सोमवार) रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. नामदेव सिताराम कऱ्हाळे ( रा. जामठी खुर्द ) असे मृताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तालुक्यातील जामठी खुर्द येथील लक्ष्मण आनंदा ईसाये व नामदेव सिताराम कऱ्हाळे हे त्यांच्या दुचाकी वाहनावरून (सोमवार) वांझोळा येथे कामासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास येथील काम आटोपून ते परत जामटी खुर्दकडे निघाले होते. यावेळी कनेरगाव नाका येथील रेल्वे स्थानकाच्या समोर एका कार चालकाने (एमएच -३८- व्ही – ७७३३) समोर विहिरीचे काम सुरू असल्यामुळे दगड उडून कारवर आदळेल या भीतीमुळे कार भरधाव वेगात मागे घेतली. मात्र यावेळी कार पाठीमागे व उभ्या असलेल्या दुचाकीवर आदळली.

या अपघातात दुचाकीवरील लक्ष्मण इसाये गंभीर जखमी झाले, तर नामदेव कऱ्हाळे यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली. या अपघाताची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील, उपनिरीक्षक बाबुराव जाधव, जमादार गजानन बेडगे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी नामदेव कऱ्हाळे यांना उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी लक्ष्मण इसाये यांच्या तक्रारीवरून कारचालक विरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Back to top button