अत्याचारांमुळे होरपळतेय ‘ती’

अत्याचारांमुळे होरपळतेय ‘ती’
Published on
Updated on

अशोक मोराळे/महेंद्र कांबळे

पुणे : एकतर्फी प्रेम प्रकरणातून महिला व मुलींवरील हल्ले, तसेच महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असताना ही बाब थेट गृहमंत्रालयानेच गांभीर्याने घेतली आहे. राज्यातील अशा घटनांबाबत ठोस कारवाई व अशा घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना पोलिसांना केल्या आहेत.

पोलिसांच्या तुटपुंज्या उपाययोजनांमुळे या घटना थांबण्याचे नाव घेत नसून, त्या वाढतानाच दिसत आहेत. त्यामुळे एकतर्फी प्रेमातून हल्ले, महिला अत्याचार थांबणार तरी केव्हा असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. नुकतेच सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे एकतर्फी प्रेम प्रकरणातून युवकाने अल्पवयीन मुलीचा धारदार शस्त्राने भोकसून खून केल्याची खळबळजनक घटना घडली. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील लोहरा शहरात 3 मार्च रोजी एका 18 वर्षीय तरुणीचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर संशयित युवकानेही विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटल्यानंतर याची दखल विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिविशेनात घेण्यात आली आहे.

गृह विभागाने केल्या सूचना

याच पार्श्वभूमीवर गृहविभागाने एकतर्फी प्रेमातून होणारे हल्ले रोखण्यासाठी राज्यातील पोलिसांना कार्यवाहीपर सूचना केल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी अशा स्वरूपाच्या गंभीर घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये गंभीर दखल घेऊन योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करावी. प्रत्येक पोलिस ठाणे, चौकी, पोलिस दूरपरिक्षेत्रातील सर्व पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना महिलांच्या गुन्ह्यांबाबत गांभीर्याने लक्ष घालावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. हद्दीतील महिला अत्याचारविरोधी पथकांना सदैव सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. महिला अत्याचाराच्या घटनांमुळे पोलिस व गृह विभागाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित होतात.

असे असले तरी पोलिस तेवढ्यापुरते घटनांना गांभीर्याने घेतात. मात्र, अल्पावधीतच ना महिला पथके कार्यरत राहतात, ना महिलांच्या तक्रारीवर गांभीर्याने कारवाई होते. अशा प्रकारामुळे अत्याचार करणार्‍या व्यक्तींचे आयतेच फावते. अशा गुन्ह्यांमध्ये 20 टक्क्यांहून अधिक शिक्षेचा दर जरी असला तरी उर्वरित प्रकरणांचे काय, हा प्रश्न विचार करण्यास भाग पाडणारा आहे.

घटना घडल्यानंतरच यंत्रणा होते सज्ज

वानवडी येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्याच्या तिसर्‍या दिवशी सहा वर्षांच्या अल्वपयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला होता. दोन्ही घटनांमध्ये रिक्षाचालकांचा सहभाग आढळल्यावरून पोलिस यंत्रणा चांगलीच कामाला लागली होती. लोहमार्ग पोलिस, महापालिका प्रशासन आणि पुणे पोलिसांनी एकत्र येऊन दूरगामी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने पावले उचलली होती. याचा परिणाम रेल्वेस्थानक, बसथांबे, भुयारी मार्ग येथे पोलिस बंदोबस्त वाढल्याने अगदी दोन महिन्यांतच अपहृत 50 मुलींची सुटकाही झाली होती. परंतु या घटना घडून चार महिने झाले अन् सर्व प्रशासन यंत्रणा सुस्तावल्याचे दिसून येते. वडगाव शेरीतील अल्पवयीन मुलीवरील हल्ल्याची ही घटना हे दर्शवत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

पुण्यातील घटनादेखील गंभीरच

12 ऑक्टोबर 2021 रोजी बिबवेवाडीतील यश लॉन्स येथे सराव करत असताना कबड्डीपटू असलेल्या चौदा वर्षाच्या मुलीवर नात्यातील मुलाने कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली होती. हा खूनदेखील एकतर्फी प्रेमप्रकरणातून झाला होता. मैत्रिणींसोबत ती मुलगी बिबवेवाडी येथील यश लॉन्स परिसरात कबड्डीचा सराव करीत होती. कबड्डी खेळून झाल्यानंतर ती मैत्रिणींसोबत थांबली होती. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या आरोपी व त्याच्या साथीदारांनी कोयत्याने वार करून तिचा खून केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news