

पुढारी ऑनलाईन डेस्क
ही दाक्षिणात्य अभिनेत्री बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. 'थडम' या सुपरहिट चित्रपटात ती याआधी झळकली होती. दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा असलेली तान्या होप (Tanya Hope) आता बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर तान्याच्या (Tanya Hope) पहिल्या तमिळ ब्लॉकबस्टर चित्रपट 'थडम'च्या हिंदी रिमेकमध्ये काम करत आहेत. या वृत्ताने तान्या खूप खूश आहे.
याविषयी तान्या म्हणते. 'प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून हे खूप मोठे यश आहे. थडमचा हिंदी रिमेक येत आहे, याचा मला आनंद आहे. मूळ चित्रपटात मी मुख्य भूमिकेत होते, हे मी स्वतःला भाग्यवान समजते.
साऊथमधून येणाऱ्या अभिनेत्रींचं बॉलिवूडमध्ये खूप नाव आहे. त्यात तापसी पन्नू ते तमन्ना भाटिया, पूजा हेगडे, सामंथा रुथ प्रभू आणि काजल अग्रवाल य अभिनेत्रींची नावे समोर येतात. आता या अभिनेत्रींच्या या यादीत तान्या होपला आपले नावदेखील जोडायचे आहे. तिच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल तान्या म्हणते, 'जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा मी आपोआप बॉलिवूडमध्ये पदार्पण करेन.'
बॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट विकी डोनरच्या साऊथच्या रिमेकमध्ये तान्याने यामी गौतमची भूमिका साकारली होती, याबद्दल ती म्हणते, 'काही उत्तम कथा वेगवेगळ्या भाषांमध्ये बनवल्या जात आहेत आणि मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत. मी तमिळमध्ये बॉलिवूड चित्रपटाचा रिमेकही केला आहे. तो 'विकी डोनर'चा रिमेक होता, ज्याचे नाव होते 'धरला प्रभु'. यामी गौतमने साकारलेली भूमिका मी केली आहे. त्यामुळे चित्रपट चांगला असेल तर त्याचा रिमेक का करू नये, असे माझे वैयक्तिक मत आहे.