

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरात हिजाबचा मुद्दा चर्चिला जातोय. देशभरातील विविध भागात हिजाब प्रकरण गाजले. अनेकजण विविध प्रतिक्रिया देत आहेत. या दरम्यान, एका बिग बॉस स्पर्धक अभिनेत्री महजबी सिद्दीकी हिने ग्लॅमर विश्व सोडून हिजाब घालण्याचा निर्णय घेतलाय. पण, याआधी बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसिम आणि सना खाननेही बॉलिवूड सोडल्याचे उदाहरण आपल्या समोर आहे. या अभिनेत्री आपल्या धर्माच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेतला. आता महजबी सिद्दीकीनेही ग्लॅमर विश्व सोडला आहे.
महजबीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये तिने लिहिलंय-"मी २ वर्षांपासून खूप अस्वस्थ होते. मला समजत नव्हते की काय करावे. जेणेकरून माझ्या मनाला शांतता मिळेल. अल्लाहची आज्ञा मोडून व्यक्ती कधीही शांती मिळवू शकत नाही. आपण एखाद्याला आनंदी करण्यासाठी काहीही केले तरी ते लोक आनंदी नसतात. अल्लाहला खुश ठेवणे ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. मी गेल्या एका वर्षापासून सना बेहेनला फॉलो करत आहे. मला अल्लाहची उपासना करून शांती मिळाली आणि माझी इच्छा आहे की अल्लाहने माझ्या पापांना माफ करावे आणि मला योग्य मार्गावर चालण्याची क्षमता द्यावी."
अशी पोस्ट करत मेहजबीने ग्लॅमरचं विश्व सोडल्याचं सांगितलं. मेहजबीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये ती हिजाबमध्ये दिसत आहे. अनेक नेटकऱ्यांनी तिला संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
महजबी बिग बॉसच्या ११ व्या सिझनमध्ये दिसली होती. बिग बॉसच्या घरामध्ये ती फार काळ नव्हती. ती लगेच बिग बॉसच्या घराबाहेर पडली. ती यावेळी ग्लॅमरस लूकमध्ये दिसली होती.