चंद्रावर जमीन खरेदी करता येत नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका : दा.कृ. सोमण | पुढारी

चंद्रावर जमीन खरेदी करता येत नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका : दा.कृ. सोमण

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा: लघुग्रह आदळून पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होणार, लवकरच जगबुडी होणार, चंद्रावरचे प्लॅाटस् खरेदी करता येतील, जन्मराशीप्रमाणे आकाशातील तारकांना तुमचे नाव दिले जाते अशा अनेक अफवा पसरविल्या जाऊन वेगळाच व्यवसाय सुरु झाला आहे. त्यामुळे अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन दा. कृ. सोमण यांनी केले.

डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, डोंबिवली शिवसेना शहर शाखा आणि साहित्ययात्रा यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली पूर्वेकडील के. बी. विरा शाळेच्या पटांगणावर आयोजित ग्रंथोत्सवात दा. कृ. सोमण यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी दा. कृ. सोमण यांनी अवकाशाची दहा आश्चर्ये आणि त्यामागील वैज्ञानिक सत्ये यांचा उलगडा केला.

चमत्कारामागील विज्ञान समजून घ्या

अशक्य हा शब्द विज्ञानात नाही आणि जगात चमत्कार नावाची गोष्ट नाही. चमत्कारामागचे विज्ञान समजून घ्यायला पाहिजे. सुखी जीवनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवण्याची गरज असल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले. आश्चर्य वाटेल असेल अशा घटना असंख्य आहेत. हे विश्व १३.७ अब्ज वर्षांपूर्वी एका महास्फोटातून निर्माण झाले आहे. हे विश्व विस्तारत आहे. महास्फोटानंतर अवकाश-स्पेस, काल-टाइम आणि वस्तू- मॅटर निर्माण झाले. या विश्वात अब्जावधी आकाशगंगा आहेत. यामध्ये आपली आकाशगंगा आहे. या आकाशगंगेत आपली सूर्यमाला असून त्यात आपली पृथ्वी आहे. या विश्वात आपले जीवन नगण्य आहे. आपण काही काळापुरते पृथ्‍वीवर आलेले पाहुणे आहोत. आपण त्याचे मालक नाहीत, असेही दा. कृ. सोमण म्‍हणाले.

सूर्य पाच अब्ज वर्षांपूर्वी जन्मला आला असून अजून पाच अब्ज वर्षे राहणार आहे. म्हणून घाबरू नका. सूर्यावर दर सेकंदाला ६३ कोटी हायड्रोजनचे ज्वलन होते. हायड्रोजनचे हिलीयममध्ये रूपांतर होते. सौरडाग दर ११ वर्षांनी वाढतात. आपला सूर्य आकाशगंगेच्या मध्यापासून २७ हजार २०० प्रकाशवर्ष अंतरावर राहून दर सेकंदास २२० किमी. या वेगाने आकाशगंगेच्या मध्याभोवती प्रदक्षिणा करतो. २५ कोटी वर्षांत त्याची एक प्रदक्षिणा होते. आत्तापर्यंत सूर्याने २० प्रदक्षिणा पूर्ण केल्या आहेत. सूर्य आहे म्हणून पृथ्वीवर जीवसृष्टी आहे, असेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार किमी. अंतरावर आहे. चंद्र पृ्थ्वीवर आदळणार नाही. उलट पृथ्वीवरील सागराला येणा-या भरती-ओहोटीमुळे चंद्र दरवर्षी ३.८ से. मीटरने दूर जात आहे. चंद्रावरून आकाश काळे दिसते. सूर्य, पृथ्वी, ग्रह-तारका दिसतात. पृथ्वी चंद्राच्या चौपट आकाराची दिसते. दा. कृ. सोमण यांनी चंद्राची सफर करताना पृथ्वीवर पौर्णिमा असते त्यावेळी चंद्रावर अमावास्या असते याचे उदाहरणे दिले. तर चंद्रावरून सूर्यग्रहण व पृथ्वीग्रहणे कशी दिसतील? हे त्यांनी समजावून सांगितले.

खग्रास व कंकणाकृती सूर्यग्रहण

१६ फेब्रुवारी १९८० रोजी दा. कृ. सोमण यांनी पाहिलेल्या पहिल्या खग्रास सूर्यग्रहणाचे वर्णन यावेळी  त्यांनी केले. भारतात खग्रास सूर्यग्रहण २० मार्च २०३४ रोजी काश्मीरमध्ये आणि महाराष्ट्रात खग्रास सूर्यग्रहण १८ सप्टेंबर २२४८ रोजी होणार आहे. तर भारतात कंकणाकृती सूर्यग्रहण २१ मे २०३१ रोजी तर महाराष्ट्रात ३ नोव्हेंबर २४०४ रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

१७ नोव्हेंबर २००० रोजी ताशी चारशे किलोमीटर उल्का पडताना पाहायला मिळाल्या. असा लिओनिड मोठा उल्कावर्षाव दर ३३ वर्षांनी पाहायला मिळतो. तसेच उल्का आणि अशनी यातील फरक यावेळी सांगितला.

यावेळी सोमण यांनी लोणारचे दर्शन अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले. सर्वांनी एकदा तरी लोणारला जाऊन प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ६० मीटरचा अशनीपाषाण आदळण्याची घटना ३०० वर्षात घडते. १०० मीटरचा अशनीपाषाण आदळण्याची घटना ५ हजार वर्षात, १ किमीचा ३ लक्ष वर्षात आदळण्याची शक्यता असते. १० किमी आकाराचा १० कोटी वर्षात आदळू शकतो. अशा घटना क्वचित घडतात. त्यामुळे कोणीही चिंता करू नये, असेही त्यांनी सांगितले.

परग्रहावरची जीवसृष्टी याविषयी प्रत्येकाला कुतुहल असते. अजूनपर्यंत एलियन्स पृथ्वीवर आलेले नाही. पण इतर सूर्यमालेतील इतर ग्रहांवर जीवसृष्टी असू शकेल. अंतरे खूप असल्यामुळे अजून संपर्क साधता येत नसल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले. सोमण यांनी पाहिलेल्या हॅले धूमकेतूंची माहिती त्यांनी दिली. स्वीफ्ट टटल धूमकेतू १४ ॲागस्ट २१२६ रोजी पृथ्वीवर आदळेल असे शास्त्रज्ञांना पूर्वी वाटले होते. पण त्याच्या मार्गात आता बदल होत आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. तसे होण्याची शक्यता निर्माण झाली तर धूमकेतूचा मार्ग बदलणे शक्य होईल, असा विश्वास दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केला.

भविष्यात अवकाश सहल शक्य

भविष्यात अवकाश सहल शक्य होईल. शून्य गुरुत्वाकर्षणात राहणे, अवकाशातून पृथ्वीदर्शन घेणे, अंतराळ स्थानकात राहणे आणि हनिमूनसाठी प्रत्यक्ष चंद्रावर जाणे सहज शक्य होईल असे त्यांनी सांगितले.

आपले जीवन आकाशातील ग्रहांवर नाही तर माणसाच्या मनातील आग्रह, विग्रह, अनुग्रह, संग्रह, पूर्वग्रह इत्यादी ग्रहांवरच अवलंबून असते असे सांगून, पुढच्या शंभर वर्षात आश्चर्यकारक शोध लागणार आहेत. मेडिकल शास्त्रात जबरदस्त शोध लागणार आहेत. संगणक क्षेत्रात तर अनेक शोध लागून माणसाचे जीवनच बदलले जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील शोधांची माहिती त्यानी दिली. शास्त्रज्ञांनी असे एक इंजेक्शन शोधून काढावे की, ते दिल्यावर माणसे माणसासारखी वागतील, अशी अपेक्षाही दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केली.

यावेळी वयाची ८० वर्षे पूर्ण केली तसेच पंचांग आणि खगोल अभ्यासाची पन्नास वर्षे पूर्ण केल्याबद्दल, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, शिवसेना डोंबिवली शहर शाखा, शेतीजन्य आणि साहित्ययात्रा यांच्यातर्फे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानपत्र, शाल, महावस्त्र, पुस्तक आणि श्रीफळ देऊन दा. कृ. सोमण यांचा सन्मान करण्यात आला. अमेय रानडे यांनी सूत्रसंचालन केले.  ( अफवांवर विश्वास ठेवू नका )

हेही वाचलंत का? 

(video : कोल्हापूर महापालिकेचा सफाई कर्मचारी ठरला संकटातील प्राण्यांचा ‘दादा’ )

Back to top button