

मुंबई; पुढारी ऑनलाईन
गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी जगभरातून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात आहे. लता मंगेशकर आयसीयूमध्ये असल्याने डॉक्टरंच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
९२ वर्षांच्या लता यांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्यांना न्यूमोनिया झाल्यानंतर ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयू विभागात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या माहितीनुसार, लता यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाही झाला होता. ज्यावेळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यावेळी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं होतं.
त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर चाहत्यांकडून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यात आली. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी प्रार्थना अद्यापही चाहते करत आहेत.
डॉ. प्रतित समधानी यांनी लता यांच्या आरोग्याविषयी अपडेट माहिती दिलीय. डॉक्टर म्हणाले, लता यांच्यासाठी प्रार्थनेची गरज आहे.
वयोमानानुसार, त्यांना आरोग्याच्या अन्य समस्या असल्याचे सांगितले जात आहे. वय अधिक असल्याने त्यांची प्रकृती सुधारण्यास वेळ लागत आहे, अशीही माहिती समोर आलीय.
याआधी त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याच्या कारणास्तव नोव्हेंबर २०१९ मध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या बहिण उषा मंगेशकर यांनी सांगितलं होतं की, त्यांना व्हायरल इन्फेक्शन असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सप्टेंबर २०२१ मध्ये त्यांनी आपला ९२ वा वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांना ट्विटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
पाहा व्हिडिओ –