कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक आज गुरुवारी (दि. २०) झाली. संख्याबळानुसार अध्यक्षपद निवड करण्यात आली आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाली आहे तर काँग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून उपाध्यक्षपदासाठी उत्सुकता लागून राहिली होती. (Hasan Mushrif and Awale)
दरम्यान, सत्तारूढ आघाडीची सकाळी ११ वाजता बैठक झाली. यामध्ये हसन मुश्रीफ आणि राजूबाबा आवळे यांची नावे निश्चित झाली. जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे हे आघाडीअंतर्गत पाडापाडीबद्दल आपली स्पष्ट भूमिका सर्व नेत्यांसमोर मांडतील अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे आघाडीच्या बैठकीत वातावरण तापले होते.(Hasan Mushrif and Awale)
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीला १८, तर विरोधी आघाडीला ३ जागा मिळाल्या आहेत. संचालक मंडळात नको असलेले कोरे यांचे विरोधी बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर निवडून आल्याने विनय कोरे संतप्त आहेत.
शासकीय विश्रामगृह येथे मुश्रीफ यांची भेट घेऊन बाहेर पडल्यावर विनय कोरे यांनी आपली भेट ही मुख्यमंत्री रस्ते योजनेसंदर्भात होती. जिल्हा बँकेसंदर्भात कोणतीही चर्चा आपण केली नाही. जी काही चर्चा करायची ती खुलेपणाने उद्याच्या बैठकीत करू, असे दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले.
जिल्हा बँक निकालात कोणत्या तालुक्यात कोणाला किती मते पडली हे स्पष्ट झाले आहे, असे सांगून कोरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.