गोवा : काँग्रेसचा रेजिनाल्ड यांना धक्‍का | पुढारी

गोवा : काँग्रेसचा रेजिनाल्ड यांना धक्‍का

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कुडतरीचे (गोवा) माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना काँग्रेसची उमेदवारी मिळणार नाही हे बुधवारी स्पष्ट झाले. काँग्रेसमधून भाजपमध्ये जाऊन परतलेले मोरेनो रिबेलो यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. रेजिनाल्ड यांनी काँग्रेस पक्ष सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तृणमूल काँग्रेसच गोव्याचे संरक्षण करू शकेल, असा साक्षात्कार त्यांना झाला होता. त्यांनी पक्ष सोडल्यावर खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी आपले पुत्र शालोम यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे दामटले होते. 27 दिवसांत पुन्हा रेजिनाल्ड यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष सोडला; पण काँग्रेसने त्यांना लगेच प्रवेश दिला नाही. त्यांच्या काँग्रेस प्रवेश देण्याविषयी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी निर्णय.

  • काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले केदार नाईक यांना अपेक्षेप्रमाणे साळगाव मतदारसंघाची उमेदवारी
  • मायकल लोबो यांनी याच नाईक यांच्या प्रचाराची केली होती सुरुवात
  • प्रियोळ मतदारसंघातून डॉ. दिनेश जल्मी यांना उमेदवारी

रेजिनाल्ड अपक्ष लढणार, कुडतरीत घोषणा

मडगाव (गोवा) : पुढारी वृत्तसेवा
कुडतरीचे माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी तृणमूलमध्ये प्रवेश करून स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे. तृणमूल सोडल्यावर त्यांनी काँग्रेसने आपल्याला पुन्हा पक्षात घ्यावे, अशी याचना केली होती.पण, त्यांची मागणी धुडकावून लावत काँग्रेसने माजी जिल्हा पंचायत सदस्य मोरेनोे रिबेलो यांना उमेदवारी दिल्याने रेजिनाल्ड यांचा पत्ता कट झाल्यास जमा आहे. सायंकाळी रेजिनाल्ड यांनी त्यांच्या कुडतरी येथील निवासस्थानी तातडीने कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

त्या चुकांतून आपण शिकलो

आपण चुका केल्या असतील; पण त्या चुकांतून आपण शिकलो आहे. काँग्रेसने आपल्याला उमेदवारी नाकारली. जो व्यक्‍ती भाजपातून काँग्रेसमध्ये आला त्याला उमेदवारी दिली, अशी खंत रेजिनाल्ड यांनी व्यक्‍त केली. माझ्या समर्थकांनी आपल्याला अपक्ष निवडणूक लढवावी, अशी गळ घातली आहे. यापुढे लोकच हायकमांड आहेत. ते सांगतील तो निर्णय आपल्याला मान्य असेल. गेल्या पंधरा वर्षांपासून आपण आमदार म्हणून निवडून येत आहे. आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत आपल्यावर कधीच भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही, असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसतर्फे डिलायला : शिवोलीत तिरंगी शक्य

शिवोली मतदारसंघात काँग्रेसतर्फे पर्राच्या सरपंच डिलायला लोबो यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे याठिकाणी भाजप आणि अपक्ष अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भाजपतर्फे माजी आमदार दयानंद मांद्रेकर यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. तर गोवा फॉरवर्ड पक्षाला राम राम ठोकण्याच्या तयारीत असलेल्या विनोद पालयेकर यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे याठिकाणी तिरंगी लढतीची चिन्हे स्पष्ट आहेत. मायकल लोबो यांनी आपल्या पत्नी डिलायला करिता यापूर्वी भाजपकडे हा मतदारसंघ मागितला होता. परंतु, लोबो काँग्रेसवासीय होताच पक्षाने त्यांच्या पत्नीला हा पक्ष सोडला आहे.\

हेही वाचा

Back to top button