अन्य अनेक देशांप्रमाणे अमेरिकेचा इतिहासही रक्तरंजित आहे. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांची गुलामगिरी नष्ट करून, माणुसकीला काळिमा फासणार्या या प्रथेचे उच्चाटन करण्याचे प्रमुख श्रेय अब्राहम लिंकन यांच्याकडे जाते. त्यासाठी त्यांना खूप धडपड करावी लागली आणि चार वर्षे यादवी युद्ध करावे लागले. जगभर लोकशाहीचा आणि मानवी मूल्यांचा पुरस्कर्ता म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. 4 फेब्रुवारी 1861 रोजी लिंकन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर, थोड्याच दिवसांत अमेरिकेतील 11 राज्यांनी संघराज्यातून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. दक्षिणेकडच्या राज्यांच्या भूमिकेमुळे यादवी युद्ध अटळ झाले होते. 9 एप्रिल 1865 रोजी बंडखोरांच्या सैन्याचा जनरल ली याने शरणागती पत्करली आणि यादवी युद्ध संपले. तरीही दक्षिणेकडील राज्यांतील अनेक तरुणांच्या मनात लिंकन यांच्या बद्दल संताप होताच.
14 एप्रिल 1865 रोजी वॉशिंग्टन येथील एका नाट्यगृहात नाटक पाहात असताना जॉन विल्किस बूथ या तरुणाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला 1961 मध्ये राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर जॉन केनेडी यांनी अमेरिकेसाठी चांद्रमोहिमेचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला. देशातील वंशभेदाला छेद देण्यासाठी त्यांनी उपाहारगृहांसारख्या सार्वजनिक ठिकाणीही कृष्णवर्णीयांनाही गोर्यांप्रमाणेच प्रवेश मिळावा, असा आग्रह धरला. केनेडी हे ‘प्रोफाइल्स इन करेज’ हे प्रतिष्ठेचे पुलित्झर पारितोषिकप्राप्त पुस्तक लिहिणारे विद्वानही होते. अमेरिकेचा चेहरामोहरा बदलून टाकणार्या केनेडी यांचीही 22 नोव्हेंबर 1963 रोजी हत्या झाली. 1881 मध्ये जेम्स गारफिल्ड आणि 1901 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅककिनली यांचीही हत्या झाली. जेराल्ड फोर्ड, रोनाल्ड रेगन आणि जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्याही हत्येचे प्रयत्न झाले; पण सुदैवाने ते बचावले. शनिवारी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि आगामी निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला. त्यानंतर 78 वर्षांच्या ट्रम्प यांनी तत्काळ खाली वाकण्याची तत्परता दाखवली आणि जखमी झाल्यानंतरही मूठ आवळून, न घाबरता लढणार असल्याचे सांगितले. डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्ष उमेदवार आणि अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी झालेल्या खुल्या वादविवादात ट्रम्प यांनी त्यांच्यावर मात केली होती. हल्लेखोर ‘एआर स्टाईल’ रायफल घेऊन सभास्थानाच्या इतक्या जवळ पोहोचूच कसा शकला हा प्रश्न असून, गुप्तचर यंत्रणांना त्रुटींचा विचार करावाच लागेल. ट्रम्प यांच्यावरील या हल्ल्याबाबत अनेक रिपब्लिकन्सनी बायडेन व त्यांच्या सहकार्यांवर दोषाचे खापर फोडले आहे. ट्रम्प हे लोकशाहीविरोधी असून, ते पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी येणे हे अमेरिकेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचा प्रचार डेमोक्रॅटिक पक्षाने सुरू केला आहे. रिपब्लिकन हा उजव्या विचारसरणीचा आणि डेमोक्रॅटिक हा डावीकडे झुकलेला मध्यममार्गी पक्ष मानला जातो. अमेरिकेत यापूर्वीही राष्ट्राध्यक्षांना संपवण्याचे कट रचले गेले असले, तरीही ताज्या घटनेची पार्श्वभूमी वेगळी आहे.
अमेरिकेतील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक ध्रुवीकरण वाढत चालले आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असताना, 7 मुस्लिम देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास त्यांनी बंदी घातली होती. क्यूबा व इराणशी ओबामा सरकारने केलेले करारही त्यांनी केराच्या टोपलीत टाकले. अनेक जागतिक करारांतून अमेरिका बाहेर पडली आणि ‘अमेरिका फर्स्ट’च्या नावाखाली संकुचित व्यापार धोरणे ट्रम्प यांनी रेटली. चीनशी व्यापारयुद्ध सुरू केले. अमेरिकेतील गौरेतर समाजाविरुद्ध वातावरण तापवले. देशाच्या न्यायव्यवस्थेवर टीकेचे हल्ले केले आणि राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक हरल्यानंतर ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकन संसदेवरच हल्ला केला. जहाल भाषणे, समाजमाध्यमांवरून जहरी प्रचार ही ट्रम्पवाद्यांची खासियत बनली आहे. ज्या राज्यांमध्ये डेमोक्रॅटिकचा जोर आहे, तेथे शस्त्रास्त्रांवर निर्बंध घालणारे कायदे आहेत. उलट जेथे रिपब्लिकन वरचढ आहेत, तिथे निर्बंध तर सोडाच; पण अस्तित्वात असलेली बंधनेही सैल करण्याचे प्रयत्न सुरू असतात. दोन वर्षांपूर्वी 18 वर्षांच्या एका मुलाने अमेरिकेतील टेक्सास राज्यात एका प्राथमिक शाळेवर हल्ला करून 19 मुलांना ठार मारले होते. अमेरिकेतील दर शंभर लोकांमागे 120 बंदुका आहेत. जानेवारी 2019 ते एप्रिल 2021 या काळात अमेरिकेत 75 लाख लोकांनी बंदुका खरेदी केल्या आणि त्यात 50 लाख अज्ञान वयोगटातील मुलांचा समावेश होता, अशी आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे.
बंदूक संस्कृतीवर आळा घालण्यासाठी कठोर कायद्यांची गरज बायडेन यांनी व्यक्त केली होती. परंतु अमेरिकेत ‘नॅशनल रायफल असोसिएशन’ ही शस्त्रास्त्रांची शक्तिशाली लॉबी असून, तिचे प्रस्थ मोठे आहे. ट्रम्प यांच्यावर हल्ला करणार्या मॅथ्यू क्रुक या 20 वर्षांच्या तरुणाकडे सहजासहजी बंदूक येते आणि तो ती बिनधास्तपणे चालवतो, हे धक्कादायक आहे. ट्रम्प समर्थकांनी 6 जानेवारी 2021 रोजी संसद परिसरात धिंगाणा घातला, त्यास अनेक अमेरिकनांचे समर्थन असले, तरी एका पाहणीत आश्चर्यकारक निष्कर्ष बाहेर आले आहेत. ट्रम्प यांना आता पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनण्यासाठी बंदुकीचा वापर करावा लागला तरी हरकत नाही, असे पाहणी केलेल्यांपैकी 10 टक्के लोकांचे मत असल्याचे आढळले. हिंसाचाराचे समर्थन करणार्यांपैकी 33 टक्के लोकांकडे बंदूक आहे. याचा अर्थ असा आहे की, रिपब्लिकन्स व ट्रम्प यांना विरोध करणारे काही डेमोक्रॅटिकवादीही टोकाचे विचार मांडत आहेत. लोकशाहीत उजव्या, डाव्या, मध्यम अशा सर्व विचारांना स्थान असते. ट्रम्प यांनी कितीही अतिरेक केला असला, तरीही पुन्हा राष्ट्राध्यक्ष होण्याचा त्यांना अधिकार आहेच. त्यांच्या विरोधात न्यायालयात काही प्रकरणे असून त्यांच्यावर निवडणूक लढवण्यास कायद्याने बंदी आली असती, तर गोष्ट वेगळी होती. केवळ अमेरिकेतच नव्हे, तर कुठेही लोकशाही टिकवण्यासाठी एकांगी व असहिष्णू राजकारण असता कामा नये. हिंसक भाषा वापरणे वा कृती करणे हे त्या नेत्याच्या जीवावरसुद्धा बेतू शकते. भारतातील सत्ताधारी व विरोधी पक्षांनीही अमेरिकेतील या घटनेपासून योग्य तो बोध घेतला पाहिजे.