सुसंस्कृत आणि व्यासंगी व्यक्तिमत्त्व

सुसंस्कृत आणि व्यासंगी व्यक्तिमत्त्व

मुख्यमंत्री, लोकसभा सभापती आणि शिवसेना नेते म्हणून मनोहर जोशी (Manohar Joshi) यांनी मराठी माणूस, मराठी भाषा, हिंदुत्व आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आयुष्य वेचले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. सौम्य शब्दांतूनही आपण आपला विरोधातील विचार मांडू शकतो, हा त्यांचा गुणविशेष मला नेहमीच महत्त्वाचा वाटत आला. (Manohar Joshi)

संबंधित बातम्या : 

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्याशी सुमारे 35 वर्षांपासून माझे स्नेहबंध होते. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्याआधीपासून माझा त्यांच्याशी परिचय होता. त्यानंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. लोकसभेचे अध्यक्ष, शिवसेनेचे नेते म्हणून सातत्याने त्यांचे मार्गदर्शन मला लाभले. जोशी हे अत्यंत अभ्यासू, सुसंस्कृत आणि चतुरस्र व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्यातील समयसूचकता विशेष उल्लेखनीय होती. मुख्यमंत्री असतानाच्या काळात प्रशासनावर त्यांची पकड होती. हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे एक अनुयायी, एक सैनिक या नात्याने त्यांनी हळूहळू राजकारणामध्ये प्रमुख पदाची भूमिका घेतली होती. (Manohar Joshi)

शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात त्यांची नोंद राहील. शिवसेना आणि भाजप युतीदरम्यान काही प्रश्न निर्माण झाले, तर ते सोडवण्यावरही त्यांचा भर असायचा. 2014 मध्ये भाजप आणि शिवसेना युती होण्यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, तेव्हा ते मला म्हणाले होते की, माझ्याकडे चर्चेची जबाबदारी द्या, मी पाच मिनिटांमध्ये युती करून दाखवतो. राजकारणातील आणि पक्षातील, युतीतील इतक्या वर्षांच्या अनुभवांमधून, निरीक्षणांमधून कुणाचे स्वभाव कसे आहेत, याची त्यांना पूर्णतः जाण होती. महिला आधार केंद्राच्या अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती राहिली. त्यावेळी महिलांच्या प्रश्नांसंदर्भात मी करत असलेल्या कार्याबाबत त्यांचे मार्गदर्शनही मला लाभले. (Manohar Joshi)

जोशी यांची एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे 2002 ते 2004 या काळात ते लोकसभेचे अध्यक्ष होते, तेव्हा पुण्यातील टिळक स्मारक मंदिरामध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी आज ना उद्या महिलांना आरक्षण मिळेल, अशी इच्छा व्यक्त केली होती. इतकेच नव्हे, तर त्यांच्या अधिपत्याखाली विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांना एक तृतीयांश आरक्षणाचा ठराव एकमताने मंजूर झाला होता. श्रद्धा आणि सबुरी ही जोशी यांची दोन तत्त्वे होती. यापैकी सबुरी ठेवणे हा मूलमंत्र त्यांनी आयुष्यभर जपला. गेल्या काही वर्षांत म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर त्यांची प्रकृती फारशी चांगली नव्हती. तरीही शिवसेनेच्या कार्यक्रमांवर त्यांचे चाणाक्ष लक्ष होते. 1996 मध्ये स्थापन झालेल्या कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कृषी अर्थकारणाला, सिंचनाला आणि पर्यायाने समाजकारणाला मिळालेला आधार कदापि विसरता येणार नाही.

महिला आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून मला त्यांचे सहकार्य लाभले. विधान परिषद आमदारकीच्या वेळीही त्यांचे आशीर्वाद मला लाभले. तसेच, विधानसभा अध्यक्ष बनल्यानंतरच्या काळातही त्यांचे सातत्याने मार्गदर्शन मला लाभले. राजकारण असो, समाजकारण असो वा कोणतेही क्षेत्र असो, त्या क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांच्या जाण्यानंतर एक प्रमुख प्रश्न पडतो की, आपण या व्यक्तिमत्त्वांच्या सहवासातून काय शिकलो? या परिप्रेक्ष्यातून जोशी यांच्याबाबत सांगायचे झाल्यास सौम्य शब्दांतूनही आपण आपला विरोधातील विचार मांडू शकतो, हा एक महत्त्वाचा गुणविशेष मला शिकता आला. सातत्याने शिवराळ भाषा वापरणे, एकमेकांवर चिखलफेक करणे यापासून ते नेहमीच दूर राहिले. त्यामुळेच आजही आम्हाला ते आदर्श वाटतात. त्यांना आदरांजली वाहताना आम्हा सर्वांचा एक हक्काचा मार्गदर्शक हरपल्याचे दुःख मनात आहे. जोशी यांच्या निधनाने सुसंस्कृत नेत्याला महाराष्ट्र आणि देश मुकला आहे. (Manohar Joshi)

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news