पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचे शुक्रवारी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी २१ फेब्रुवारी रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे ३ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी "नगरसेवक, महापौर ते राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष असा त्यांचा प्रवास राजकारण- समाजकारणात येऊ पाहणाऱ्या पिढ्यांकरिता दीपस्तंभासारखा मार्गदर्शक राहणार आहे. "असं ट्विट करत श्रद्धांजली वाहिली. (Manohar Joshi Passed Away)
सीएमओ या 'X' खात्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांना पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,
"शिक्षण क्षेत्रातील सर ते लोकसभा अध्यक्ष म्हणून 'स्पीकर सर' अशी भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे, अशी शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपल्यासाठी वैयक्तिक पातळीवर ही मोठी हानी आहे, असे नमूद करुन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र एका सुसंस्कृत, व्यासंगी नेत्याला मुकला असल्याचेही म्हटले आहे.
नगरसेवक, महापौर ते राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष असा त्यांचा प्रवास राजकारण- समाजकारणात येऊ पाहणाऱ्या पिढ्यांकरिता दीपस्तंभासारखा मार्गदर्शक राहणार आहे. ते शिक्षक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, कला-साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यासंगी होते. 'महाराष्ट्र भूषण' या राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराची सुरुवातही त्यांच्याच पुढाकाराने झाली. लोकसभा अध्यक्षपदाची त्यांची कारकीर्द वैशिष्ट्यपूर्ण राहिली. सरांच्या निधनामुळे जोशी परिवारावर, त्यांचे स्नेही, कार्यकर्ते यांच्यावर आघात झाला आहे. तो सहन करण्याची ईश्वराने या सर्वांना ताकद द्यावी अशी प्रार्थना करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे."
मनोहर जोशी बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. राजकीय वर्तुळात त्यांना 'जोशी सर' म्हटले जायचे. १९९५ ते १९९९ पर्यंत महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री होते. राज्यात सर्वोच्च पद भूषवणारे अविभाजित शिवसेनेचे ते पहिले नेते होते. मुंबईचा महापौर ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास होता. राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांनी ६ वर्ष काम केले. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर २००२ ते २००४ या काळात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेवर असताना ते लोकसभेचे अध्यक्ष होते. मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचे पार्थिव सकाळी ११ ते २ या वेळेत माटुंगा पश्चिम येथील रुपारेल कॉलेज येथील त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पार्थिवावर दादर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हेही वाचा