Manohar Joshi : संघर्षाच्या भट्टीत तावून सुलाखून निघालेला शिवसेनेचा ‘चाणक्य’ | पुढारी

Manohar Joshi : संघर्षाच्या भट्टीत तावून सुलाखून निघालेला शिवसेनेचा 'चाणक्य'

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पूर्वीच्या कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातील नांदवी या खेडेगावात सरस्वती आणि गजाननराव जोशी या गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊन माधुकरी मागून, वारावर जेवून, वडिलांबरोबर भिक्षुकी करुन, नोकरी करीत, ‘कमवा आणि शिका’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारा, शिक्षणासाठी निरनिराळ्या ठिकाणी भटकत भटकत मुंबईत स्थिरस्थावर होऊन मुंबई महापालिकेच्या लिपिकाची नोकरी करणाऱ्या आणि त्याच महापालिकेच्या महापौर पदी विराजमान झालेला तसेच पक्षनिष्ठेचा आदर्श ठेवीत नगरसेवक, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री ते लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचणारा अस्सल मराठमोळा ‘चाणक्य’ राजकारणी अशी ओळख महाराष्ट्र नव्हे तर देशपातळीवर निर्माण करणारा राजकारणी म्हणजेच डॉ. मनोहर गजानन जोशी! (Manohar Joshi Passed Away)

संबंधित बातम्या : 

१९६७ साली शिवसेनेत प्रवेश

मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली. या संघटनेच्या आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्वाने प्रभावीत झालेल्या मनोहर जोशी (Manohar Joshi) यांनी १९६७ साली शिवसेनेत प्रवेश करीत राजकारणात स्वतःला झोकून दिले. २ डिसेंबर १९३७ रोजी नांदवी या रायगड जिल्ह्यात गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेल्या मनोहर यांनी वडिलांबरोबर भिक्षुकी केली. गरीब कुटुंबात जन्म घेतल्यामुळे ‘कमवा आणि शिका’ या तत्वाने लहानपणापासून संघर्ष आपल्या नशिबी आला. भिक्षुकी करुन पैसा मिळवीत शिक्षण सुरु ठेवले. इयत्ता चौथी पर्यंत नांदवी, पाचवीला महाड, सहावीनंतर मामाकडे पनवेलला, मामांची बदली झाल्यामुळे गोल्फ मैदानात बॉयची नोकरी करीत मित्राबरोबर भाड्याच्या घरात राहिले. महाजन बाईंकडे वारावर भोजन केले. मग मुंबईत बहिणीच्या घरी अकरावीच्या शिक्षणासाठी आले. सहस्रबुद्धे क्लासमध्ये शिपायाची नोकरी करुन शिक्षण पूर्ण केले. कला शाखेची पदवी कीर्ती महाविद्यालयातून मिळविली. वयाच्या २७ व्या वर्षी एम. ए. एल. एल. बी. झाले. मुंबई महापालिकेत लिपिकाची नोकरी करता करता १९६४ साली सावित्रीबाई आणि श्रीमान दत्तात्रय हिंगवे यांची कन्या मंगल यांच्या समवेत विवाहबद्ध झाले. विवाहानंतर मंगल यांचे नांव अनघा असे करण्यात आले. मनोहर जोशी यांना उन्मेष हे सुपूत्र तर अस्मिता आणि नम्रता या दोन सुकन्या आहेत. अर्थात, ही मुले राजकारणापासून कोसोमैल दूर आहेत. चिरंजीव उन्मेष हे प्रथितयश ‘कोहिनूर’ उद्योजक आहेत.

लिपीकाची नोकरी केलेल्या मुंबई महापालिकेचे महापौर

मनोहर जोशी (Manohar Joshi) यांनी उद्योजक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून काही व्यवसाय केले पण दूध, फटाके, हस्तीदंती वस्तू च्या विक्री मध्ये अपयश आले. २ डिसेंबर १९६१ रोजी कोहिनूर क्लास सुरु केला. या क्लासचे रुपांतर प्रिन्सिपॉल मनोहर गजानन जोशी यांच्या कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये झाले. मनोहर जोशी हे १९६७ साली बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावामुळे शिवसेनेत प्रवेश करते झाले. त्यांनी संसदीय लोकशाहीच्या एकेक पायऱ्या पादाक्रांत करण्यास सुरुवात केली. ज्या मुंबई महापालिकेच्या इमारती मध्ये लिपिकाची नौकरी केली, त्याच महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून पाऊल टाकले. १९७६ ते १९७७ या वर्षी मनोहर जोशी हे महापौर झाले.

हिंदुत्वाची व्याख्या आणि सोडावी लागली आमदारकी

मुंबई महापालिकेकडून मनोहर जोशी (Manohar Joshi) यांनी आपला मोर्चा विधानभवनाकडे वळविला आणि महाराष्ट्र विधानपरिषदेवर सदस्य म्हणून तीन वेळा निवडून गेले. मनोहर जोशी, प्रमोद नवलकर आणि सुधीर जोशी ही त्रिमूर्ती इथून पुढे महाराष्ट्रात गाजू लागली. भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोद महाजन यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत शिवसेना भाजप ही हिंदुत्वाच्या आधारावरची युती घडवून आणली. त्यामुळे १९९० साली शिवसेनेचे ५२ आणि भारतीय जनता पक्षाचे ४२ आमदार विधानसभेत निवडून आले. यावेळी मनोहर जोशी यांची बाळासाहेब ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली. याच दरम्यान, दादर मतदारसंघात मनोहर जोशी यांच्याकडून पराभूत झालेल्या काँग्रेसच्या भाऊराव पाटील यांनी मनोहर जोशी यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली.

गिरगाव चौपाटीवर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या प्रचारासाठी जाहीर सभेत भाषण करतांना, “महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरात मध्ये राहतो तो गुजराती, बंगाल मध्ये राहतो तो बंगाली या न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदु, आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, आमचे हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे नव्हे !” असे ठणकावून सांगितले होते. हाच आधार घेऊन भाऊराव पाटील यांनी मनोहर जोशी यांनी हिंदु म्हणून धर्माच्या नावाखाली निवडणूक लढविल्याचा आणि तो निवडणूक भ्रष्टाचार असल्याचा मुद्दा मनोहर जोशी यांच्या विरोधात मांडला. १९९१ साली छगन भुजबळ यांच्या समवेत १५ आमदारांनी शिवसेना सोडून काँग्रेस प्रवेश केला, त्यामुळे विधानसभेत शिवसेनेचे विरोधी पक्षनेते पद भारतीय जनता पक्षाच्या गोपीनाथ मुंडे यांच्याकडे गेले. १९९०-१९९१ हे एक वर्ष विरोधी पक्षनेते राहिलेल्या मनोहर जोशी यांना मुंबई उच्च न्यायालयातील निकाल त्यांच्या विरोधात गेल्यामुळे आमदारकी सोडावी लागली. पुढे सर्वोच्च न्यायालयाने बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची व्याख्या ग्राह्य मानून ११ डिसेंबर १९९५ रोजी निकाल दिला आणि डॉ. मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची हिंदुत्वाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.

१९९५ ला बिगर काँग्रेस शिवशाही सरकारचे मुख्यमंत्री

१९९५ साली पुन्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युती विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली आणि १९९० साली थोडक्यात हुकलेली युतीची सत्ता १९९५ साली आली. १४ मार्च १९९५ रोजी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवतीर्थावर मनोहर गजानन जोशी (Manohar Joshi) यांनी मुख्यमंत्री तर गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून ऐतिहासिक व अभूतपूर्व सोहळ्यात शपथ घेतली. महाराष्ट्रात १९७८ नंतर पुन्हा एकदा बिगर काँग्रेसचे शिवशाही सरकार आले. त्यांनी १ मे १९९५ पासून मराठी भाषेत कामकाज सुरु झालेच पाहिजे, असा सुस्पष्ट आदेश दिला. जोशी-मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने ‘बॉम्बे’ चे ‘मुंबई’ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मंजूर करण्यात आला.

मनोहर जोशी शिवसेनेतील ‘चाणक्य’

मनोहर जोशी (Manohar Joshi) यांना १९९९ साली उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून दिल्लीच्या राजकारणात जाण्याची संधी मिळाली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात आधी अवजड उद्योग मंत्री म्हणून मनोहर जोशी यांची वर्णी लागली. लोकसभेचे अध्यक्ष जी. एम. सी. बालयोगी यांचे निधन झाले. तेव्हा प्रमोद महाजन यांनी आपली चकल्लस चतुराई दाखवीत अटलबिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत सल्ला मसलत करुन मनोहर जोशी यांना थेट लोकसभेच्या अध्यक्षपदी संसदीय लोकशाहीच्या सर्वोच्च स्थानी बिनविरोध विराजमान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दादासाहेब मावळणकर, शिवराज पाटील यांच्या रांगेत मनोहर जोशी यांना स्थान मिळाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत मनोहर जोशी हे शिवसेनेतील ‘चाणक्य’ म्हणूनच ओळखण्यात येत होते. आपल्या आयुष्यात संघर्षाच्या भट्टीत तावूनसुलाखून निघालेले हे हिंदुस्थानातील सच्चे निष्ठावंत राजकीय नेते म्हणून डॉ. मनोहर गजानन जोशी यांनी आपला ठसा निश्चितच उमटविला आहे. सुसंस्कृत चाणक्य डॉ. मनोहर गजानन जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. (Manohar Joshi Passed Away)

हेही वाचा : 

Back to top button