थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील

बालपणीच नाना पाटील यांच्या गळ्यात पांडुरंगाची माळ
Great freedom fighter Kranti Singh Nana Patil
थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटीलPudhari File Photo
Published on
Updated on
डॉ. श्रीमंत कोकाटे

आपल्या देशाला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक स्वातंत्र्य मिळावे, यासाठी अनेक क्रांतिकारकांनी सर्व आयुष्य समर्पित केले. त्यातील अत्यंत प्रखर योद्धा म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील! नाना पाटील यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी सांगली जिल्ह्यातील बहे या त्यांच्या आजोळी झाला. नाना पाटील यांचे मूळ गाव येडेमच्छिंद्र. वडिलांचे नाव रामचंद्र पाटील. नाना पाटील यांचे वाडवडील पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यामुळे बालपणीच नाना पाटील यांच्या गळ्यात पांडुरंगाची माळ पडली. आज त्यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त...

Great freedom fighter Kranti Singh Nana Patil
पाऊस आला मोठा...

सातवी उत्तीर्ण झाल्यानंतर नाना पाटील यांनी नोकरी करावी, असे वडिलांना वाटायचे. आजीची इच्छा होती की, त्यांनी गावातच राहावे व पैलवान व्हावे. नानांना नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि ते तलाठी झाले. सुर्ली, वाठार या ठिकाणी त्यांनी तलाठी म्हणून काम केले. दरम्यान, त्यांचा विवाह झाला; परंतु पत्नीला शिकवत नाही, तोपर्यंत मी पत्नी म्हणून व्यवहार करणार नाही, असा निर्धार त्यांनी केला. त्या काळात मुलींनी शिकणे म्हणजे अधर्म मानला जात होता. अशा काळात नानांनी पत्नीला स्वतः शिकविले. त्यांना एक कन्यारत्न आहे. त्यांचे नाव क्रांतिविरांगणा हौसाक्का पाटील असे आहे. त्यांनीही पुढे भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्या काळात सर्वत्र सत्यशोधकी जलसे होत असत. महात्मा जोतिराव फुले यांच्या विचाराचा प्रसार गावागावांत जलसाच्या माध्यमातून केला जात होता. नानांनी बालवयापासूनच महात्मा फुले यांचे विचार ऐकले होते. महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव नाना यांच्या व्यक्तिमत्त्वावर होता. राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भास्करराव जाधव यांनी सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात पुरोगामी विचारांची पेरणी केली होती. नाना यांच्यावर सत्यशोधक चळवळीचा प्रचंड प्रभाव होता. तलाठी म्हणून काम करत असताना ते सत्यशोधक विचारांचा प्रचार करायचे. तसेच स्वातंत्र्याचे महत्त्वही ते जनतेला पटवून सांगायचे. भास्करराव जाधव हे निवडणुकीला उभे असताना नाना यांनी त्यांचे समर्थन केले. त्यामुळे तत्कालीन शासन व्यवस्थेने नाना यांना तलाठी पदावरून निलंबित केले. वरिष्ठ अधिकारी म्हणाले, ‘तुम्ही माफी मागा. आम्ही तुम्हाला नोकरीवर घेतो.’ तेव्हा नाना इंग्रजांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना म्हणाले, ‘तुम्ही लुटारू आहात. तुम्ही जुलमी आहात. त्यामुळे तुम्ही माफी मागायच्या लायकीचे नाही.’ असा बाणेदारपणा नाना यांच्याकडे होता.

Great freedom fighter Kranti Singh Nana Patil
तडका : गुरुजी... तुम्हीसुद्धा?

नोकरी गेली. आजीचे निधन झाले. पत्नीचे निधन झाले. क्रांतिसिंह यांनी नाउमेद न होता स्वतःच्या जमिनीचा आणि वाड्याचा वाटा दोन भावाला वाटून दिला. कन्या हौसाक्का यांना त्यांच्या आजोळी म्हणजे दुधोंडी या ठिकाणी ठेवले आणि नाना यांनी पूर्णवेळ स्वातंत्र्यासाठी झोकून दिले. 1930 च्या सविनय कायदेभंग आंदोलनात उडी घेतली. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे प्रेरणास्थान होते. त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. नाना यांनी चले जाव आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. जुलमी इंग्रजांचे राज्य नष्ट व्हावे आणि जनतेला पूर्ण स्वातंत्र्य मिळावे, यासाठी ब्रिटिशांची रेल्वे लुटणे, पोस्ट खाते लुटणे, भूमिगत राहून स्वातंत्र्याचे आंदोलन छेडणे यामध्ये नाना निष्णात होते. त्यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी जंग जंग पछाडले. नानांना पकडून देण्यासाठी त्या काळात इंग्रजांनी पाच हजारांचे इनाम जाहीर केले. आजीच्या अंत्यविधीसाठी आलेल्या नानांना पकडण्यासाठी इंग्रजांनी चोहोबाजूंनी वेढा टाकला; पण मोठ्या कौशल्याने इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन ते निसटले.

Great freedom fighter Kranti Singh Nana Patil
निकाल लागला; प्रश्न कायम

नाना यांनी प्रतिसरकारची स्थापना केली. गावोगावी प्रशिक्षण वर्ग सुरू करणे, गरिबांना न्याय मिळवून देणे, अस्पृश्यता निर्मूलन, हुंडाबंदी, बिनखर्चाचे विवाह करणे, संपूर्ण दारूबंदी, जुगारबंदी, गुन्हेगारांना शिक्षा, स्त्रियांना संरक्षण, वाचनालय सुरू करणे, काळाबाजार रोखणे, सावकारशाही नष्ट करणे आदी महत्त्वपूर्ण कार्य प्रतिसरकारने केले. इंग्रजांच्या काळात संपूर्ण देशभर जुलमी राजवट असताना सातारा, सांगली परिसरात सामान्य जनतेचे सरकार म्हणजेच प्रतिसरकार होते. नाना यांनी युवकांची एक आघाडी स्थापन केली. त्या आघाडीला तुफान सेना असे नाव दिले. क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड, कॅप्टन रामभाऊ लाड, नागनाथअण्णा नायकवडी हे नाना यांचे तरुण तडफदार, निर्भीड, लढवय्ये शिलेदार होते. कष्टकरी, शेतकरी, मजूर, स्त्रियांचा विकास व्हावा यासाठी काँग्रेसमधील केशवराव जेधे, कर्मवीर भाऊराव पाटील, तुळशीदास जाधव, शंकरराव मोरे, भाऊसाहेब राऊत आदींनी 3 ऑगस्ट 1947 रोजी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. नाना शेतकरी कामगार पक्षात आले. ते शेतकरी कामगार पक्षाचे धुरंदर, लढवय्ये, स्वाभिमानी आणि प्रामाणिक नेते होते. पुढे त्यांनी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. नाना हे 1957 मध्ये सातारा आणि 1967 मध्ये बीड येथून दोन वेळा खासदार झाले. जनमाणसाच्या हक्क व अधिकारांसाठी संसदेत मराठी भाषेतून आवाज उठवणारा महाराष्ट्रातील पहिला खासदार म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील! केवळ राजकीय स्वातंत्र्य म्हणजे परिपूर्ण स्वातंत्र्य नव्हे, तर जनतेला शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, यासाठी नाना यांनी आवाज उठवला. गोवामुक्तीसाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. बेळगाव, कारवार हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट झाला पाहिजे, यासाठी त्यांनी संघर्ष केला. त्यामुळे त्यांना सिमोगा या ठिकाणी तुरुंगवास भोगावा लागला. मुंबई गुजरातला देण्याचा मोरारजीभाई देसाई, पंडित नेहरू यांचा डाव होता. तो डाव क्रांतिसिंह नाना पाटील, अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर इत्यादी शूरवीरांनी उधळून लावला. नाना यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये उडी घेतली. सहकार्‍यांच्या साथीने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, यासाठी त्यांनी आवाज उठविला. मुंबई महाराष्ट्राला मिळाली. यामध्ये नाना यांचे मोलाचे योगदान आहे.

Great freedom fighter Kranti Singh Nana Patil
नक्षलवादाला प्रत्युत्तर देताना...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news