

नमस्कार मंडळी. आज आपण राडा म्हणजे नेमके काय आणि ज्यांच्याकडून तो अपेक्षित नाही त्यांच्याकडून हा राडा कसा होतो, याची माहिती घेऊयात. एकाच संस्थेच्या, पक्षाच्या, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी किंवा सदस्यांनी समोरासमोर आल्यानंतर झालेल्या धक्काबुक्कीला, मारामारीला राडा असे म्हणतात. मुंबईतील दोन भावांचे दोन पक्ष अशा प्रकारच्या राड्यासाठी प्रसिद्ध आहेत. विशेषतः गणेशोत्सव काळात या पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर येतात आणि साहजिकच तीव्र राग असल्यामुळे त्यांच्यामध्ये भांडणे होतात, यालाच राडा असे म्हणतात. कुठेही राडा झाला तर चार-दोन टाळकी फुटणार हे निश्चित असते. या प्रकारात कोणाचा जीव जात नाही; परंतु आपल्या विरोधी असणार्या काही लोकांना शारीरिक इजा निश्चित होत असते. तुम्ही म्हणाल, आज सकाळी-सकाळी हा काय लेखनाचा राडा करून ठेवला आहे? सांगतो.
जशा विविध लोकांच्या संघटना असतात, तशाच शिक्षक मंडळींच्या म्हणजेच गुरुजींच्या संघटना असतात. अडचणीच्या वेळेला पतपुरवठा व्हावा यासाठी सहकारी पतपेढ्या पण असतात. या पतपेढ्यांना दरवर्षी सार्वजनिक सभा घ्यावी लागते. महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर या सभेमध्ये घ्यावे लागतात. अर्थकारण आले की, राजकारण येते आणि राजकारण आले की, राडा होत असतो. सांगली येथील अशाच एका सार्वजनिक सभेमध्ये एकमेकांच्या विरोधात असलेले गुरुजी समोरासमोर आले आणि विद्यार्थ्यांना ते देत असलेला संयमाचा, शांततेचा धडा विसरून एकमेकांच्या अंगावर धावून गेले. शिक्षक सभेमध्ये घडलेला हा प्रकार राज्यात काही पहिला नाही. यापूर्वी एकमेकांची डोकी फोडताना बरेच शिक्षक पाहण्यात आले आहेत. पोलिसांना न जुमानता एकमेकांच्या अंगावर धावून जाणारे गुरुजी विद्यार्थ्यांना काय संदेश देत आहेत, हे समजून घेणे मात्र महत्त्वाचे आहे.
भांडणे होण्याचे कारण म्हणजे सत्ताधारी पक्ष काही गैरफायदा घेत आहे की काय, अशी शंका असणे आणि दुसरे म्हणजे कुठे काही भ्रष्टाचार सुरू आहे काय, याविषयीची शंका असणे. नोकर भरती आणि घोटाळा हे सूत्र आता सर्वत्र मान्य झाले आहे. सत्ताधारी संचालक मंडळाने नोकर भरती करताना आपल्याच नातेवाईकांची वर्णी लावली, असा विरोधी गुरुजी मंडळींचा आक्षेप होता. या पाठोपाठ मुद्द्याची गोष्ट गुद्द्यावर येते आणि हाणामारीला सुरुवात होते. दोन व्यक्तींच्या भांडणांमध्येसुद्धा सुरुवातीला वाद होतात आणि नंतर तीव्रता वाढून त्याचे पर्यावसन हाणामारीत होत असते. सभ्य, सुसंस्कृत आणि समाजाला दिशा दाखविणार्या शिक्षकांकडून तरी असे होणे अपेक्षित नाही.
एव्हानापर्यंत गुरुजींच्या हाणामारीची टीव्हीवर दिसणारी व्हिडीओ क्लिप त्यांच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली असेलच. ‘ते बघ, ते बघ, आपले गुरुजी कशी मारामारी करत आहेत,’ असे विद्यार्थी आपल्या मोबाईलवर एकमेकांना दाखवत असतीलच. बाकी काही असो की नसो, परंतु लढाऊ बाणा म्हणजे काय, हे या गुरुजींनी आपल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीमधून शिकवले आहे. आज देशाला याच लढाऊपणाची गरज आहे. देशाची प्रगती व्हायची असेल तर देशाचे भावी नागरिक संघर्ष करणारे आणि वेळ पडली तर रणांगणावर उतरणारे असावेत, याचा आदर्श घालून देण्यासाठीच गुरुजी मंडळी राडा करत असावीत, असे वाटते. देशाचे भवितव्य उज्ज्वल आहे, हे तुमच्या लक्षात आले असेलच.