

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे निधन होवून अवघे तीन महिने झाले आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याची निवडणूक जाहिर झाली. त्यात आपल्या आवाहनाला सभासद शेतकर्यांनी साथ देत ही निवडणुक बिनविरोध करून स्व. कोल्हे यांना एकप्रकारे श्रध्दांजली वाहिली त्याबद्दल सर्व घटकांचे कारखान्याचे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे यांनी आभार मानले आहे.
या निवडणुकीत 21 जागेसाठी 21 अर्ज प्राप्त झाले. बिनविरोध निवडलेल्या संचालकामध्ये ज्ञानेश्वर परजणे, विश्वासराव महाले, बापूसाहेब बारहाते (करंजी गट), बिपीनराव कोल्हे, विवेक कोल्हे, नीलेश देवकर (ब्राम्हणगांव गट), बाळासाहेब वक्ते, रमेश आभाळे, ज्ञानदेव औताडे (जेऊरकुंभारी गट), आप्पासाहेब दवंगे, राजेंद्र कोळपे, ज्ञानेश्वर होन (कोळपेवाडी गट), मनेष गाडे, विलास वाबळे, विलास माळी (वेळापुर गट), त्रंबकराव सरोदे (सोसायटी मतदार संघ), उषा औताडे, सोनिया पानगव्हाणे (महिला राखीव मतदार संघ), रमेश घोडेराव (अनुसुचित जाती मतदार संघ), निवृत्ती बनकर (इतर मागासवर्गीय मतदार संघ), सतिष आव्हाड (विमुक्त भटक्या जाती जमाती मतदार संघ) यांचा समावेश आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी उज्वला गाडेकर तर सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक नामदेव ठोंबळ यांनी काम पाहिले.
विवेक कोल्हे म्हणाले की, स्व. कोल्हे यांच्याकडून सहकाराचे धडे घेत नवीन पूर्ण कल्पनेतून बिपीनराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या आव्हानाला सहकार क्षेत्राने कसे सामोरे जावे, त्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत. उस उत्पादक सभासदांना कमी श्रमात कमी खर्चात अधिकचे उत्पादन आणि जास्तीचा साखर उतारा कसा मिळेल याबाबत वेळोवेळी माहिती घेवुन जादा उत्पादन देणारे उस बेणे सभासद शेतकर्यांना पूरवुन त्याबाबतचा कृती कार्यक्रम आखला आहे. शेतकर्यांच्या विश्वासाला शेवटच्या श्वासापर्यंत पात्र राहुन कारखान्यांच्या नांवलौकीकात आणखी भर घालणार आहे.
संजीवनी उद्योग समुहाची मुहुर्तमेढ माजीमंत्री स्व. कोल्हे यांनी 1960 च्या दशकात रोवली. ग्रामीण अर्थकारणाला दिशा देवून येथील शेतकर्यांच्या प्रत्येक अडीअडचणी स्वत: समजून घेत त्यावर काय उपाययोजना करता येईल. याबाबतचा कृती आराखडा आखून त्याची अंमलबजावणी केली. साखर आणि कारखानदारी याची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत साखर उत्पादनाबरोबर अल्कोहोल आधारित उपपदार्थ प्रकल्प राबवत राज्यातील साखर पायलट कारखानदारीला आधूनिकतेची दिशा दिली असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे यांनी सांगितले.