COVID-19 Vaccine Booster dose : १८ वर्षांवरील नागरिकांना १५ जुलैपासून मोफत बूस्टर डोस | पुढारी

COVID-19 Vaccine Booster dose : १८ वर्षांवरील नागरिकांना १५ जुलैपासून मोफत बूस्टर डोस

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : भारत स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने १५ जुलैपासून पुढील ७५ दिवसांपर्यंत १८ वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस (COVID-19 Vaccine Booster dose)  मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

कोरोनाची लागण होऊ नये, याकरिता 60 वर्षांवरील लोकांना बूस्टर डोस दिला जात आहे. या मोहिमेचा आता विस्तार केला जात असून 18 ते 59 वयोगटातील लोकांना मोफत बूस्टर डोस दिला जाणार आहे. 18 ते 59 वयोगटातील लोकांची संख्या 77 कोटी इतकी आहे. यापैकी एक टक्के लोकांनी देखील बूस्टर डोस घेतलेला नाही. याउलट 60 वर्षांवरील 16 कोटी लोकांपैकी सुमारे 26 टक्के लोकांनी बूस्टर डोस घेतलेला आहे. आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले लोक तसेच फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम बूस्टर डोस देण्यात आला होता.

देशातील बहुतांश लोकांचे दोन डोसचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. दोन्ही डोस घेतल्याच्या सहा महिन्यानंतर शरीरातील अँटीबॉडीजचे प्रमाण कमी होत असल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) पाहणीत दिसून आले होते. बूस्टर डोस देण्यात आला तर इम्युन प्रतिसाद वाढतो, हे लक्षात घेऊन सरकारने आता 18 ते 59 वयोगटातील लोकांसाठी बूस्टर डोसची (COVID-19 Vaccine Booster dose) योजना आणली आहे. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनिमित्त 75 दिवसांची विशेष मोहीम यासाठी हाती घेतली जाणार आहे.

हेही वाचा

 

Back to top button