भांड्याला भांडे लागतेच, त्याने नाते घट्ट होते! : सुप्रिया सुळे

Supriya Sule
Supriya Sule
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
घरात भांड्याला भांडे लागतेच. संसारात कुरबुरी होतातच. त्याने नाते आणखी घट्ट होते. सर्वांनी मनमोकळेपणाने व्यक्त होण्यात गैर नाही. आम्ही राष्ट्रवादीचे लोक मात्र आमच्यातील वाद जगासमोर आणत नाही, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लगावला. अभिनेत्री केतकी चितळेला आपण ओळखत नाही. पण कोणाचे वडील मरावे, अशी अपेक्षा करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशा शब्दांत त्यांनी या प्रकरणी भाष्य केले.

नाशिक दौर्‍यावर रविवारी (दि.15) आलेल्या खा. सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या पुढे म्हणाल्या, केतकी चितळेला मी ओळखत नाही. पण वडीलधार्‍या व्यक्तींबद्दल चुकीचे बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. खा. शरद पवा यांनी 55 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत कोणाबद्दल चुकीचे वक्तव्य केले नाही. त्यांचाच वारसा आम्ही चालवत असून, आमच्यावर मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाचे संस्कार आहेत. वादग्रस्त विधानासाठी आ. अमोल मिटकरी यांनाही नोटीस आली असल्याचे सांगताना खा. पवारांविरोधात बोलणार्‍यांना धडा शिकवण्याची भाषा करणार्‍या राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना समज दिली जाईल, असे सुळे यांनी सांगितले. भोंगे, औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन दर्शन घेणे यापेक्षाही देशापुढे महागाई, गॅस सिलिंडरचे दर असे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंर्त्यांची बैठक घेत महागाई नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन सुळे यांनी केले. अभिनेत्री केतकी चितळे हिच्या आक्षेपार्ह विधानाविरोधात भूमिका घेणार्‍या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे सुळे यांनी अभिनंदन केले. सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी वाद बाजूला ठेवत सर्वांनी एकत्रित येण्याची साद त्यांनी घातली. समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपालावरून दिलेल्या आंदोलनाच्या इशार्‍यावर बोलताना राज्यात लोकशाही आहे. लोकशाहीत सरकारवर टीका करणे हा विरोधकांचा अधिकार असून, चांगले काम करणे आमचे कर्तव्य असल्याचे सुळे यांनी सांगितले.

देशमुखांवर 109 रेड टाकण्याचा विक्रम : केंद्र सरकारकडून सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचे सांगत खा. सुळे यांनी केंद्रावर निशाणा साधला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करून अनेक महिने झाले. केंद्र सरकारने त्यांच्यावर 109 वेळा रेड टाकण्याचा विक्रम केला. 108 वेळेस रेड टाकून काहीही मिळाले नाही, म्हणून 109 वी रेड टाकावी लागली. मात्र, तरी काही निष्पन्न झाले नसल्याचेही त्या म्हणाल्या.

अयोध्या दौर्‍यात चूक काय? : राज व आदित्य ठाकरे व आ. रोहित पवार यांच्या अयोध्या दौर्‍याबाबत खा. सुळे यांना विचारले असता देशात अनेक चांगल्या गोष्टी असून, प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे. प्रत्येकाला देशातील चांगल्या गोष्टी पाहण्याचा सल्ला देताना अयोध्या दौर्‍यावर जाण्यात चूक काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच ताजमहालचा वाद निरर्थक असल्याचे त्या म्हणाल्या.

स्वराज, जेटली यांची आठवण : महागाईवरून भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांनी संसदेत तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांना 'आकडों से पेट नही भरता' असा टोला लगावल्याची आठवण सुळे यांनी सांगितली. सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर बोलताना माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी संसदेतील कॅमेरे बंद केल्यास अनेक प्रश्न सुटतील, या वक्तव्याची आठवण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news