बौद्ध पौर्णिमा विशेष : तर्कनिष्ठ, अनुभवाधारित तत्त्वज्ञान | पुढारी

बौद्ध पौर्णिमा विशेष : तर्कनिष्ठ, अनुभवाधारित तत्त्वज्ञान

बौद्धांच्या विभिन्न संप्रदायांमध्ये मतभिन्नता असली, तरी एका बाबतीत सर्वांचेच एकमत आहे. ती म्हणजे, बुद्ध हेच त्यांचे धर्म संस्थापक असून, त्यांना बोधीवृक्षाखाली तत्त्वज्ञान प्राप्त झाले. संसारापासून दूर जाण्याचा आणि अमृताची प्राप्ती करण्याचा मार्ग त्यांनी दाखविला. त्यांनी सांगितलेल्या मुक्तिमार्गाचे अनुसरण करणारी व्यक्ती संसारातील मोहमायेच्या पलीकडे जाऊ शकते. बौद्ध धर्माचे हेच मूळ आहे.

अनेक शतकांपासून गौतम बुद्ध हे आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांनी दलित आणि पीडित समाजाच्या उद्धारासाठी सर्वस्व वेचले. आजही बुद्ध आशियासाठी स्वाभिमान आणि अखिल विश्वासाठी विवेकाचा प्रेरणास्रोत ठरले आहेत. त्यांचे जीवनदर्शन आणि त्यांचे नैतिक उपदेश विज्ञानप्रेमी, आधुनिक विचारांच्या जाणकारांनाही आकर्षित करतात. कारण, त्यांचा द़ृष्टिकोन तर्कनिष्ठ आणि अनुभवाधारित आहे. भारतीय समाजातील जातिभेद त्यांनी मानला नाही. त्यांच्या धर्माचे आणि तत्त्वज्ञानाचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. बुद्धांचे अनुयायी परम उत्साही आणि धर्मप्रचाराच्या भावनेने ओतप्रोत होते. आपल्या संघाच्या सीमित क्षेत्रात संतुष्ट राहणारे हे अनुयायी नव्हते. ते दूर-दूरपर्यंत पोहोचले. पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा सर्व मार्गांनी त्यांनी यात्रा केल्या. तिबेट, इराण, तुर्कस्तान, पोलंड तसेच पाश्चात्त्य जगातील अनेक देशांमध्ये ते गेले. चीन, कोरिया आणि जपानपर्यंत पोहोचले. म्यानमार, श्याम आणि ईस्ट इंडीज, तसेच त्याच्याही पुढे पोहोचले. ज्या-ज्या ठिकाणी ते पोहोचले, त्या-त्या ठिकाणी अंधश्रद्धा आणि पुरोहितशाही या तत्त्वज्ञानाच्या सूर्यापुढे धुक्याप्रमाणे विरून गेली.

सुमारे 2600 वर्षांपूर्वीपासून वैशाख महिन्यातील पौर्णिमा बुद्धांच्या जीवनातील तीन महत्त्वपूर्ण घटनांशी जोडली गेली आहे. बुद्धांचा जन्म, बोधप्राप्ती आणि परिनिर्वाण या त्या तीन घटना होत. ज्या काळात बुद्धांचा जन्म झाला, त्याकाळचा समाज उच्च-नीचता, परंपरागत रुढी आणि अनेक प्रकारच्या अंधश्रद्धांनी ग्रासलेला होता. बुद्धांनी धर्माच्या तत्कालीन ठेकेदारांना, पुरोहितांना आव्हान दिले आणि त्यात बुद्धांचा विजय, तर पुरोहितांचा पराभव झाला. बुद्धांच्या काळातील भारत पुरोहितांच्या दहशतीने पीडित होता. मानव समाजातील दलित आणि पीडित जातींना सर्व प्रकारच्या ज्ञानापासून वंचित ठेवण्यात आले होते. अशा व्यक्तीच्या कानावर वेदांमधील एक शब्द जरी पडला, तरी त्याची भयावह शिक्षा संबंधिताला दिली जात असे. पुरोहितांनी वेदांचे रहस्य राखून ठेवले होते. प्राचीन हिंदूंनी शोधलेल्या आध्यात्मिक सत्याचे संचित याच वेदांमध्ये आहे. परंतु, ही बाब गौतम बुद्धांना सहन झाली नाही. बुद्धांकडे अत्यंत तल्लख मस्तिष्क, प्रचंड मानसिक ताकद आणि आकाशासारखे विशाल हृदय होते. पुरोहितवर्ग जनतेचे नेतृत्व कशा प्रकारे करीत आहेत आणि कशा प्रकारे ते आपल्या शक्तीद्वारे गौरवाचा अनुभव करीत आहेत, हे बुद्धांनी पाहिले आणि त्यासंदर्भात काही करण्याची इच्छा त्यांच्या मनात जागृत झाली. मानवाचे मानसिक आणि आध्यात्मिक पाश तोडण्याची इच्छा त्यांना होती. त्यांचे हृदय विशाल होते. तसे हृदय आपल्या आसपास अनेकांकडे असते. तेही इतरांना मदत करू इच्छित असतात; परंतु त्यांच्याकडे बुद्धांसारखे तल्लख मस्तिष्क नसते. लोकांना मदत करण्यासाठीची साधने आणि उपाय त्यांना ठाऊक नसतात. परंतु, बुद्धांजवळ आत्म्यांचे पाश तोडून फेकण्याचे उपाय शोधून काढणारी बुद्धिमत्ता होती. मनुष्य दुःखाने पीडित का होतो, याचा त्यांनी अभ्यास केला आणि दुःखापासून निवृत्त होण्याचा मार्ग शोधून काढला. ते खूपच निष्णात व्यक्ती होते. त्यांनी सर्व समस्यांवर उपाय शोधून काढले आणि कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला उपदेश दिला. संबोधी शांती प्राप्त करण्यासाठी त्यांनी सर्वांना प्रेरित केले.

बुद्धांनी आपल्याला प्रज्ञा आणि करुणेचा उपदेश केला. आपण केलेली परोपकाराची कामे आणि भातृभावना यानेच आपली ओळख जगाला होते.

बुद्धांची प्रतिमा ही एका ध्यानस्थ योग्याची प्रतिमा आहे. त्यांच्या द़ृष्टीने बुद्ध हा एक मनुष्य आहे; देवता नाही. तो एक उपदेशक आहे; उद्धारकर्ता नाही.

Back to top button