व्हेल माशाची ६ कोटी रुपये किंमतीची उलटी जप्‍त; तस्करी करणाऱ्या टोळीतील दोघांना बेड्या

व्हेल माशाची ६ कोटी रुपये किंमतीची उलटी जप्‍त; तस्करी करणाऱ्या टोळीतील दोघांना बेड्या
Published on
Updated on

रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्यासारख्या महाग किंमतीने विकल्या जाणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या टोळीतील दोघांना गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बाजारभावाप्रमाणे सुमारे ६ कोटी रुपये किंमतीची जवळजवळ पावणेसहा किलो वजनाची उलटी शहरानजीकच्या उद्यमनगर चंपक मैदानाजवळ जप्त करण्यात आली आहे. महम्मद जाहिर सय्यद महम्मद अत्तार (वय ५६, रा. सध्या राजापूरकर काॅलनी, उद्यमनगर, मूळ लखनौ), हमीब सोलकर (रा. लाला काॅम्प्लेक्स, रत्नागिरी) अशी अटक केलेल्‍या दोघा संशयित आराेपीची नावे आहेत.

व्हेल माशाची तस्करी होत असल्याच्या घटना गेल्या दोन वर्षांत अनेकवेळा जिल्ह्यात उघड झाल्या आहेत. संगमेश्वरनंतर पुन्हा एकदा रत्नागिरीत मोठ्या किमतीची उलटी जप्त करण्यात आल्याने जिल्ह्यात तस्करी करणारी टोळी सोमवारी रात्री जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

सोमवारी सायंकाळी उद्यमनगरनजिकच्या चंपक मैदानाजवळ दोघेजण व्हेल माशांच्या उलटीची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबर्‍याकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांना मिळाली  होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चंपक मैदानशेजारी सापळा लावला. सोमावारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन दोनजण घटनास्थळी आले. काही वेळ ते कोणाची तरी वाट पहात थांबले होते. याच वेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरु केली. त्यानंतर त्यांची तपासणी केल्या असता त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीच्या डिक्कीत सुमारे पावणेसहा किलो वजनाच्या व्हेल माशाच्या उलटीचे सफेत रंगाचे तुकडे आढळून आले. त्यानंतर त्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी ताब्यात घेतले.

'अ‍ॅम्बरगिस'ला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्यासारखी किंमत

व्हेलमाशाची उलटी म्हणजेच अ‍ॅम्बरगिस हे हलक्या राखाडी किंवा काळया रंगाचे असते. तो मेणासारखा एक दगडसदृश्य पदार्थ असतो. व्हेल माशाने तो तोंडातून बाहेर फेकला की तो वाहत किनाऱ्यावर येतो. सुगंधी द्रव्ये, सुगंधी अत्तर, बॅाडी स्प्रे, परफ्युम आणि अनेक औषधे तयार करण्यासाठी ते वापरले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ते सोन्यासारख्या महाग किंमतीने विकले जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी त्याची तस्करी करुन छुप्या पद्धतीने खरेदी‚ विक्री होत असल्याचे प्रकार उघडकीस येतात. अ‍ॅम्बरगिस हे व्हेल माशाच्या शरीरात तयार होत असून देवमाशाने तोंडावाटे ही उलटी बाहेर फेकल्यानंतर बहुतांश वेळा ती समुद्र किनारी सापडते. ही उलटी किमंती असल्याने तीची तस्करी केली जाते. यासाठीच दोघांनी ही व्हेल माशाची उलटी तस्करीसाठी आणली असल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी महम्मद जाहिर सय्यद महम्मद अत्तार (वय ५६, रा. सध्या राजापूरकर काॅलनी, उद्यमनगर, मूळ लखनौ), हमीब सोलकर (रा. लाला काॅम्प्लेक्स, रत्नागिरी) या दोघांना अटक करुन त्यांच्या विरुद्ध ग्रामीण पोलीस स्थानकात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलीस स्थानकाचे सहय्यक पोलीस उपनिरिक्षक महेश टेंमकर करित आहेत.

पोलीस अधीक्षक डॅा. मोहितकुमार गर्ग, अप्पर पोलीस अधीक्षक सौ.जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news