मान्सूनची सहा दिवस आधीच धडक; 2 जूनपर्यंत तळकोकणात | पुढारी

मान्सूनची सहा दिवस आधीच धडक; 2 जूनपर्यंत तळकोकणात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मान्सूनने अंदमाननंतर सोमवारी बंगालच्या उपसागरालाही धडक दिली. यंदा तो पाच ते सहा दिवस आधीच अंदमानात आल्याने केरळात 25 ते 27 मे, तर तळकोकणात 2 जूनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 8 जूनपर्यंत तो संपूर्ण राज्य व्यापून टाकेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

दरवर्षी अंदमानात मान्सूनचे आगमन 22 ते 24 मेदरम्यान होते. केरळमध्ये 1 ते 3 जून ही तारीख ठरलेली असते. मात्र, यंदा तो अंदमानातच सहा दिवस आधी येऊन धडकला. त्यामुळे तो आता वेगाने पूर्व-मध्य बंगालच्या उपसागारात पुढे जात आहे. हवामानतज्ज्ञांच्या मते, यंदा मान्सूनचा वेग पाहता तो तळकोकणात 8 ते 10 जूनऐवजी 2 ते 3 जूनलाच येण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यात तो 8 जूनपर्यंत येईल. त्याही पुढे उत्तर भारतात 12 ते 13 जूनपर्यंत विक्रमी वेळात तो पोहोचू शकतो.

तापमानात 4 अंशांनी घट होणार
मान्सूनच्या आगमनामुळे वार्‍यांचा वेग वाढला असून, मध्य भारतातील कमाल आणि किमान तापमानात 3 ते 4 अंशांनी घट होणार असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत 17 ते 19 मे या कालावधीत विजांचा कडकडाट, धुळीचे लोट उठून मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

कोल्हापूरसह 13 जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या तेरा जिल्ह्यांत हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

मान्सूनचा वेग प्रचंड आहे, त्यामुळे तो अंदमानात सहा दिवस आधीच आला.
तळकोकणात 2 जूनच्या सुमारास येईल, असा अंदाज आहे. मध्ये त्याला अडथळा आणणार्‍या वादळाचा अंदाज नाही. महाराष्ट्रात 6 ते 8 जून, तर उत्तर भारतात तो 12 ते 13 जूनपर्यंत जाईल, इतका त्याचा वेग जास्त आहे.
– डॉ. रामचंद्र साबळे, हवामानतज्ज्ञ

Back to top button