पुणे : देशांतर्गत गव्हाचे उत्पादन कमी झाल्याने फेब्रुवारीपासून गव्हाच्या दरात क्विंटलमागे दोनशे रुपयांनी वाढ झाली. यादरम्यान केंद्र सरकारने निर्यातीवर बंदी आणल्याने ही वाढ शंभर रुपयांनी कमी झाली आहे. मात्र, येत्या काळात गव्हाचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार बाजारात रोज 10 ते 15 ट्रकमधून 30 टन गहू बाजारात दाखल होत आहे. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, तसेच महाराष्ट्रातून ही आवक होते. यामध्ये लोकवन, तुकडी, सिहोर या गव्हाचा समावेश आहे. मार्केट यार्डात सर्वाधिक गहू मध्य प्रदेशातून येतो. त्यापाठोपाठ गुजरात, राजस्थान व राज्यातून गव्हाची आवक होते. हंगामाच्या सुरवातीला गव्हाचा प्रतिक्विंटलचा कमीत कमी 2 हजार 600 ते 2 हजार 650 रुपये दर निघाला.