Pune : मेट्रोशेडमधील गोळीबार AK-47 मधून की, SLR मधून?

Pune : मेट्रोशेडमधील गोळीबार AK-47 मधून की, SLR मधून?
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा : 'महामेट्रो'च्या पौड (Pune) रस्त्यावरील हिल व्ह्यू कारशेडमध्ये आलेल्या चार गोळ्या या एसएलआर किंवा एके 47 रायफलीसारख्या बंदुकीतील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. लष्कराच्या सरावादरम्यान या गोळ्या आल्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

मात्र, या गोळ्यांशी काहीही संबंध नसल्याचे लष्कराने स्पष्ट केल्यानंतर ही पोलिसांना हा गोळीबार नेमका कोणी आणि कोठून केला याचा शोध लावण्यात अद्याप तरी यश आलेले नाही. त्यामुळे हा गोळीबार कोणी केला याचे गूढ अधिकच वाढले आहे. गोळीबाराच्या घटनेला अठ्ठेचाळीस तासांहून अधिक कालावधी लोटला आहे. बुधवारी (दि.25) सायंकाळी ही घटना घडली होती.

सुरवातीला कोथरुड पोलिसांनी गुरूवारी दुपारपर्यंत गोळीबारच झाला नाही असे सांगितले होते. त्या ठिकाणी केवळ काही राऊंड मिळून आले आहेत असे म्हटले. मात्र दुपारनंतर त्यांनी गोळीबार झाला असून, त्यामध्ये एक कर्मचारी जखमी झाल्याचे सांगितले. तर दुसरीकडे तेथील परिसराला लागून असलेल्या काही लष्करी आस्थापनांच्या सरावादरम्यान चुकून ह्या गोळ्या मेट्रोसेडपर्यंत आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला होता.

मात्र सायंकाळी  सैन्यदलाकडून सांगण्यात आले, कोथरुड कचरा डेपो जवळ सैन्यदाल्याच्या कोणत्याही युनिटची फायरिंग रेंज नाही. त्यामुळे मेट्रोकारशेडजवळ लष्कराच्या सरावादरम्यान गोळीबार झाला असे म्हणणे पुर्णतः चुकीचे आहे म्हणत या गोळ्यांशी सैन्यदलाचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

त्यामुळे आता हा गोळीबार नेमका कोणी केला असा सवाल निर्माण झाला आहे. जर लष्कराच्या सरावादरम्यान चुकून गोळी फायरिंग रेंजच्या बाहेर आली असे गृहीत धरले तर आस्थापनापासून मेट्रोकारशेड पर्यंतचे अंतर किती आहे. फायर झाल्यानंतर गोळी एवढ्या दूर अंतरापर्यंत येऊ शकते का? फायरिंग रेंजच्या बाहेर गोळी आलीच कशी असे विविध सवाल देखील निर्माण होत आहेत.

मेट्रोशेडवर गोळीबार होऊन तेथे चार गोळ्यांचा शिसे असलेला पुढील भाग पोलिसांना आढळून आला. वेल्डींगचे काम करणार्‍या एका कर्मचार्‍याच्या छातीलाही एक गोळी चाटून गेल्यानंतर या घटनेचे गांभीर्य वाढले. याप्रकरणी कोथरूड पोलिस व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी गोळीबार झालेल्या गोळ्या या साध्या नसल्याचे आढळून आले.

या गोळ्या एके 47 अथवा एसआरएल बंदुकीच्या असण्याची शक्यता आहे. तसेच, लष्कराच्या सरावानंतर या ठिकाणी गोळ्या आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. पण, गुरूवारी रात्री लष्कराकडून या गोळीबाराशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, या परिसरात लष्कराचे कोणतेही युनिट अथवा फायरिंग रेंज नाही.

त्यामुळे सैन्याच्या गोळीबारामुळे अशी दुर्घटना घडण्याची शक्यता नसल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोथरूड सारख्या भागात थेट एसएलआर अथवा एके 47 सारख्या बंदुकीतून फायरिंग केलेल्या गोळ्या कोठून आल्या हा प्रश्न कायम आहे. सध्या या गोळ्या तपासणीसाठी फॅरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आल्या आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तपासात मदत होईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

यासंदर्भात कोथरूड वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे म्हणाले की, "या गोळीबारानंतर पोलिसांनी लष्कराकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच, स्वतः कोथरूड पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी लष्कराच्या टेकडीवर जाऊन पाहणी केली आहे. पत्राचे उत्तर मिळाल्यानंतर खरे कारण समोर येईल तसेच तपासात मदत होईल. मिळून आलेल्या गोळ्या एसएलआर किंवा 47 रायफलमधून आल्या असल्याची शक्यता आहे"

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news