कणकवली ; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा रत्नागिरीतून शुक्रवारी सायंकाळी सिंधुदुर्गात दाखल होत आहे. कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाजवळ शिवसैनिक मोठ्या संख्येने एकवटले होते. शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. यात्रेच्या स्वागतासाठी भाजपा कार्यकर्ते सज्ज असतानाच शिवसैनिक मोठ्या संख्येने एकत्र आल्याने शहरातील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
कोकणात येणारी भाजपची जन आशीर्वाद यात्रा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयीच्या त्या विधानामुळे वादग्रस्त ठरली. नारायण राणे यांच्या त्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात भाजप विरुद्ध शिवसेना आमने सामने टाकले गेले. सिंधुदुर्गातही त्याचे जोरदार पडसाद उमटले होते.
नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर सिंधुदुर्गात भाजप विरुद्ध शिवसेना यांच्यात एकमेकांविरूद्ध आरोप प्रत्यारोप करण्यात आले. मुख्यमंत्र्यांविरुद्ध केलेल्या वक्तव्यानंतर सिंधुदुर्गात शिवसेनेने जशास तसे उत्तर दिले. त्यामुळे जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्ग दाखल झाल्यानंतर नारायण राणे यांच्याकडून शिवसेनेवर टीका टिपण्णी झाल्यास त्याला सडेतोडउत्तर देण्याच्या निर्धाराने शुक्रवारी सायंकाळी कणकवली शिवसेना कार्यालयाजवळ शिवसैनिक गोळा झाले होते.
सिंधुदुर्ग हे नारायण राणे यांचे होम पीच असल्याने ते निश्चितच शिवसेनेवर निशाना साधणार असल्याचे मानले जाते.
यास तोडीस तोड उत्तर देण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक कणकवलीतील नरडवे नाका येथील मध्यवर्ती कार्यालयाजवळ गोळा झाले होते.
सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, संदेश पटेल, नीलम सावंत, सचिन सावंत, शैलेश भोगले, राजू शेट्ये, रामदास विखाळे, राजू राठोड, राजू राणे, हर्षद गावडे, महेंद्र डिचवळकर, मंगेश सावंत, दामू सावंत आदींसह शिवसैनिक एकत्र आले होते, यावेळी कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये यासाठी शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.