वडील लेकीला फोनवर म्हणाले, दहा मिनिटात येतो पण त्या क्षणानंतर… | पुढारी

वडील लेकीला फोनवर म्हणाले, दहा मिनिटात येतो पण त्या क्षणानंतर...

अंबाजोगाई; पुढारी वृत्तसेवा : मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेले वडील रात्री जेवण करण्यासाठी घरी केव्हा येतात असे संभाषण फोनवरून मुलीने केल्यानंतर त्यांना दहा मिनीटात येतो हेच त्यांचे संभाषण त्यांचे शेवटचे ठरले.

रविवारी गेलेले वडील दोन दिवसही परत न आल्यामुळे नातेवाईकांनी त्यांच्या ठावठिकाणा घेण्याची शोध मोहीम सुरू केली. शेवटी मंगळवारी त्यांचा मृतदेह गिरवली-वरवटी शिवारात आढळून आल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियानी एकच टाहो फोडला. परंतु, त्यांच्या खूनाचे अद्यापही गुढ कायम आहे.

खून करण्यात आलेला आरोपी बर्दापूर पोलीसांच्या ताब्यात असला तरी खुनाचे कारण अद्यापही पोलीसांना उलगडलेलं नाही. शहरातील खोलेश्वर प्राथमिक शाळेजवळील छल्ला भागात राहणारे फारूक लतीफ मोमीन (वय ४२) यांचा पिंपळा धा. ते परळी रस्त्यावर दुरदर्शन केंद्राजवळ विटभट्टी आहे.

मित्रासोबत जेवायला जात आहे असे सांगून ते घराबाहेर पडले

रविवारी सायंकाळी ते मित्रासोबत जेवायला जात आहे असे सांगून ते घराबाहेर पडले. परंतु रात्री आठच्या सुमारास त्यांच्या मुलीने घरी जेवणासाठी केव्हा येतात असे फोनवरून संभाषण केले असता त्यांनी दहा मिनिटामध्ये घरी येतो, मित्राच्या वाढदिवसाची पार्टी सुरू आहे, असे सांगीतले.

ते पार्टीमध्ये असल्यामुळे नातेवाईकांनी त्यांना नंतर संपर्क केला नाही. सकाळ झाली तरी ते आले नसल्यामुळे नातेवाईकांनी विटभट्टीचा परिसर व मित्रांचा शोध सुरू झाला. त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.

शेवटी त्यांचीच नातलगातील व्यक्तींना याची चौकशी केली असता, आम्ही शेपवाडी परिसरातील एका धाब्यावर त्यांच्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलो होतो. परंतु, ज्यांचा वाढदिवस होता ते मारूती उर्फ वाघ्या हनुमंत चाटे (रा. वरवटी) यांनी फारूख मोमीन यांना वरवटी येथे जेवणासाठी घेवून गेल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीसांना खाक्या दाखवताच खुनाचा माहिती दिली

ज्या धाब्यावर वाढदिवसाची पार्टी झाली, त्या धाबाचालकासह वस्तादला ताब्यात घेतल्यानंतर बर्दापूर पोलीसांना खाक्या दाखवताच त्यांनी या खुनाची पोलीसांना माहिती दिली.

वरवटी-गिरवली शिवारातील मुंडे नामक शेतकर्‍याच्या शेतामध्ये सडलेला मृतदेह असल्याची माहिती बर्दापूर पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांना संपर्क केला असता फारूख अब्दूल लतीफ मोमीन हेच असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

फारूख यांचा खून कोणी केला असावा याचे तर्कवितर्क लढविले जाऊ लागले. परंतु त्यांच्या सोबत गेलेल्या मित्राने सर्व कहाणी नातेवाईकांना सांगितल्यानंतर बर्दापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत शिंदे व जमादार महादेव आवले यांनी तपास सुरु केला.

ज्या धाब्यावर वाढदिवसाची पार्टी झाली त्या धाबाचालकासह सर्व नोकरांना ताब्यात घेतल्यानंतर खुनाचा उलघडा झाला. जो मित्र पार्टीसाठी गेला होता त्यानेच फारूख अब्दुल हा वरवटीच्या मारूती उर्फ वाघ्या हनुमंत चाटे याच्यासोबत वरवटी येथील धाब्यावर जेवणासाठी गेल्याचे उलघडले.

यामुळे संबंधित वीट चालकाचा खुन मारूती चाटे यांनीच केला असावा असा संशय पोलीसांना आल्यानंतर गुरूवारी पहाटे तीनच्या सुमारास मारूती चाटे यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. अद्यापही चाटे यांनी खुनाबाबत कुठलाही खुलासा केलेला नाही. खुनाचे कारण अद्यापही गुलदसत्यात आहे. खुनामध्ये दुसरा सहकारी आरोपी कोण आहे याचा शोध बर्दापूर पोलीस घेत असले तरी खुनाचे गुढ आजही कायम आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button