

खराळवाडी: मागील वर्षी महिला दिनानिमित्त पीएमपी प्रशासनाने महिलांसाठी तेजस्विनी बसगाड्या सुरू केल्या, तेव्हापासून ही बस अधूनमधून पिंपरी ते भोसरी मार्गावर धावताना दिसत होती. या बसमधून महिलांना प्रवास करण्याची मुभा होती. मात्र, या बसमधून सर्रासपणे पुरुष प्रवासी प्रवास करताना दिसत होते.
महिलांनी अनेक वेळा पीएमपी प्रशासनाला तक्रारी केल्या परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. अखेर दैनिक पुढारीने तेजस्विनी बसमधून पुरुषांचा सर्रास प्रवास या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच पीएमपी प्रशासनाने याची दखल घेत व पिंपरी शहर, उपनगरातील तेजस्विनी बसमधून महिलांचा प्रवास वाढला आहे.
महिला दिनानिमित्त या तेजस्विनी बसमधून महिलांना दिवसभर प्रवास मोफत ठेवला होता. त्यानंतर पीएमपी प्रशासनाने या बसगाड्या शहरात सुरू ठेवल्या होत्या. मात्र, सध्या त्या कागदावरच असल्याचे निदर्शनास येत होत्या.
पुढारीने केलेल्या पाहणीत तेजस्विनी या महिला विशेष बस गाड्यांमध्ये महिलांसोबत पुरुष प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत होती. महिलांना तिकीट काढून सुद्धा बसायला जागा मिळत नव्हती. म्हणून महिलांमध्ये नाराजीचा सूर पसरला होता. अखेर पुढारीकडे काही जागृत महिलांनी तेजस्विनी बसमधून प्रवास मिळण्यासाठी धाव घेतली. तेजस्विनी बस पिंपरी शहरात फक्त मोजक्याच प्रवास करताना दिसते. बाकी वेळेत फक्त कागदावरच महिलांसाठी सुरू आहे का? असे प्रश्न महिलांनी उपस्थित केले होते.
अखेर पुढारीने (दि 13 डिसेंबर) च्या अंकात तेजस्विनी बसमधून पुरुषांचा सर्रास प्रवास हे वृत्त प्रसिद्ध होताच पीएमपी प्रशासनाने तातडीने दखल घेतली. तेजस्विनी बस पिंपरी ते भोसरी उपनगर मार्गावर जास्त प्रमाणात दिसू लागली. व बसमधून महिलांचा मोठ्या संख्येने प्रवास दिसून आला. त्यामुळे महिला वर्गाने पुढारीचे विशेष आभार मानले.
तेजस्विनी बसला महिला प्रवाशांना वेळ दिलेली आहे. त्याच वेळेस जाताना-येताना फक्त महिला प्रवाशांना सुविधा दिली आहे. बाकी इतर वेळेला पुरुष प्रवासी बसू शकतात.
ईश्वर तुराणी, वाहतूक नियंत्रक, पीएमपी पिंपरीगाव