

पिंपरी: मकर संक्रांती सणाच्या साहित्य खरेदीसाठी महिलांची बाजारात वर्दळ वाढली आहे. संक्रांतीला वाण देण्याची पद्धत आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या वस्तू बातारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये 10 रुपयांपासून 150 रुपयांपर्यंतच्या वस्तू उपलब्ध आहेत. दरवेळी प्लास्टिक आणि स्टिलच्या वस्तूंऐवजी दुसरे काही उपयोगी ठरणारे देवू शकतो का, असा विचार करत असाल तर आता बाजारात बनारसी व पैठणी कॉईन पाऊच, ओटी कोन, मोत्याचा गजरा, आकर्षक फोल्डिंग बॅग्ज असे विविध पर्याय उपलब्ध झाल्या आहेत.
संक्रांतीच्या प्रत्येक गावानुसार चालीरिती वेगवेगळ्या असतात. संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी- कुंकू कार्यक्रम करण्याची प्रथा आहे. संक्रांतीच्या दिवशी घरातील गृहिणी ओळखीच्या, शेजारच्या महिलांना बोलावून वाण देते. हे वाण म्हणजे संक्रांतीनिमित्त भेटवस्तू देणे होय.
बाजारात प्लास्टिक वस्तू 10 ते 50 रुपये, ज्वेलरी बॉक्स, बास्केट, फोल्डिंग बॅग तसेच नावीन्यपूर्ण वस्तू विक्रीस आल्या आहेत. प्लास्टिकमुक्ती, प्रदूषण, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण या विषयांवर खूप वर्षापासून जनजागृती केली जाते. त्यामुळे प्लास्टिकच्या वस्तू देण्याऐवजी मसाले, छोटीशी गुळाची ढेप, कापडी पिशव्या, बटवे, कंगवे, क्लचर, हेअर क्लिप्स, रबरबँड अशा वस्तू वाण म्हणून दिल्या जातात. वाण देताना या वस्तू घरातील अडगळ न होता तिचा वापर व्हायला हवा अशा उद्देशाने या वस्तू दिल्या जातात. यासाठी काही नवीन पर्याय पाहुया.
बनारसी व पैठणी कॉईन पाऊच
बनारसी व पैठणीच्या कापडापासून बनविलेला हा पाऊच महिलांना वाण देण्यासाठी उत्तम पर्याय ठरत आहे. डिजिटल जग असले तरी घरामध्ये महिलांना हाताशी सुटे पैसे लागतातच. हे सुटे पैसे मोठ्या बँगेत लवकर सापडत नाहीत. यासाठी हा छोट्याशा आकाराचा हा पाऊच कामी पडणार आहे.
ओटी कोन
संक्रातीनिमित्त महिला ऐकमेकींची ओटी भरतात. पण हे सर्व सामान जवळ बाळगायचे कसे, हा प्रश्न असतो. प्रत्येक साहित्याला वेगळी पिशवी घेण्यापेक्षा या ओटी कोनामध्ये सर्व साहित्य टाकून ओटी भरणे सोयीस्कर ठरत आहे. हे ओटी कोन खणाच्या कापडातील असून त्यावर सुंदर अशी नथीची कलाकुसर केली आहे.
मोत्याचा गजरा अन् नथ
हल्ली प्रत्येक सणाला महिला पारंपरिक वेशभूषा करतात. यामध्ये मोत्यांच्या दागिन्यांचा ट्रेन्ड आहे. संक्रांतीच्या वाणासाठी मोत्याचा गजरा आणि नथ हादेखील पर्याय महिलांना उपयुक्त ठरतो.