

महापालिका निवडणूक जसजशी जवळ येते तसे, शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अर्थात अजित पवार यांनी थेट पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भष्ट्राचाराच्या मुद्दयाला हात घातला आहे. यावर अद्याप विरोधक म्हणजेच भाजपाकडून काही उत्तर आले नाही; परंतु भाजपा कार्यकर्त्यांकडून मात्र दादांच्या या वक्तव्याविरोधात सोशल मिडीयावर चांगलेच रान उठवले आहे.
अजित पवार यांनी महापालिकेतील भष्टाचाराबाबत निशाणा साधत आगपाखड केली. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणनू पिंपरी-चिंचवड महापालिकेची ओळख आहे; परंतु सत्ताधाऱ्यांनी अक्षरशः खर्चाच्या खाईत लोटली.
काही कोटी रुपयांच्या ठेवी देखील मोडल्या गेल्या. मग, एवढा खर्च केलाच आहे, तर शहरातील कामे दाखवा ना, असे थेट आव्हान दादांनी भाजपाला दिले. यावर प्रतिउत्तर देण्याऐवजी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावरच ‘खोटं बोला पण रेटून बोला दादा’... अशी पिपाणी वाजवत आहे.
सर्वात जास्त ट्रेडिंग असलेले झटपट पटापट... च्या चित्रफितीच्या माध्यमातून प्रतिउत्तर देत शहरातील आंद्रा -भामा पाणी प्रकल्पासून ते मेट्रो, हॉकी स्टेडिअम अशा दहा ते पंधरा विकासकामांची चित्रफितच व्हायरल केली.
ही चित्रफीत सोशल मिडीयावर सध्या चांगलीच गाजत आहे. या चित्रफितीची खमंग चर्चा रंगली आहे. या चित्रफितीच्या शेवटी ‘बटण कमाळाचेच दाबतील, कारण योजना पुढे पाच वर्षे चालू ठेवायाच्या आहेत’... हे दादांचे वाक्य टाकण्यासही ते विरसले नाहीत.