

पिंपरी: दरवर्षी हिवाळ्यामध्ये बर्फाळ आणि अतिथंड वातावरणातील पक्षी सुरक्षित आणि संतुलित वातारणाच्या शोधात स्थलांतर करीत असतात. यापूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात देखील या परदेशी व परराज्यातील पाहुण्याचे आगमन व्हायचे. मात्र, शहरातील माळरानावर प्लॉटिंग, पाणथळ जागा बुजविल्याने आणि वृक्षतोड यामुळे पक्ष्यांचे स्थलांतर कमी झाले आहे.
शहरात टाटा मोटर्सचे सुमंत सरोवर, वाल्हेकरवाडी, रावेत, संभाजीनगर बर्ड व्हॅली, चिखली मैला शुद्धिकरण केंद्र आणि दगडांच्या खाणी आहेत. चिंचवडगावात नदीकाठी धनेश्वर मंदिर व गावडे घाट, चऱ्होली, रहाटणी, थेरगाव बोट क्लब, सीएमई इंजिनिअरींग कॉलेज याठिकाणी पाणथळ जागी हिवाळ्यात विविध जातीच्या आणि परदेशी पक्ष्यांचा अधिवास असायचा. त्यामुळे शहरातील नागरिकांना परदेशी पक्ष्यांचे प्रत्यक्ष दर्शन देखील व्हायचे.
हे पक्षी ज्या ठिकाणाहून स्थलांतर करतात त्याठिकाणी बर्फामुळे अन्नाची कमतरता आणि हवामान यामुळे पक्षी स्थलांतर करतात. तसेच विणीच्या काळात घरटे बांधण्यास सुरक्षित जागा व परिस्थिती नसल्याने या पक्ष्यांचे स्थलांतरीत होते. शहरात युरोप, रशिया, सैबेरिया असे परदेशी तर हिमालय, मेघालय, उत्तरप्रदेश येथून काही पक्ष्यांचे स्थलांतर होते. चक्रवाक, शेकाट्या, तांबुल, मोन्टाग्युचा भोवत्या, लाल अंजन, नकटा, थपाट्या आदी पक्ष्यांचा समावेश आहे.\
अधिवास नष्ट होत असल्यामुळे स्थलांतराचे प्रमाण कमी
शहरातील पाण्याचे स्रोत नाहीसे होत चालले आहेत. प्राण्यांना आसरा घेण्यासाठी झाडे पुरेशी नाहीत. नद्यांचे रूपांतर नाल्यांमध्ये झाले आहेत पाणी अशुद्ध होऊन वेगवेगळी रसायने मिश्रित झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जलसंपत्ती व पाणथळ जागा नष्ट होत आहेत.
रस्तारुंदीकरण आणि नदीसुधार प्रकल्प
मेट्रोची कामे आणि रस्ते रुंदीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात या वृक्षांची छाटणी करण्यात आली. शहरात मोठ्या प्रमाणात परदेशी वृक्ष लावण्यात आले. त्यामुळे पक्ष्यांना घरटी करायला जागा राहिली नाही. देशी झाडे आणि त्यावर अवलंबून असणारी जीवनसाखळी तुटली. सध्या नदी सुधार प्रकल्पामध्ये देखील मोठ्या प्रमाणात देशी वृक्षांची कत्तल करण्यात आली. नदीकाठी देखील वृक्ष राहिले नाहीत. त्यामुळे पक्ष्यांच्या अधिवासासाठी आणि घरटी करण्यासाठी जागाच राहिली नाही.
शहरातील खाणींवर साकारलेले प्रकल्प
सध्याच्या ऑटो क्लस्टर आणि सायन्स पार्क याठिकाणी कधीकाळी दगडी खाणी होत्या. त्याच्या पुढे असणाऱ्या बिग बाजार याठिकाणी देखील खाण होती. या खाणीमध्ये पाणी साचून याठिकाणी जीवसृष्टी तयार झाली होती. तसेच काही वर्षापूर्वी एच.ए. कंपनी व हाफकिन परिसरात खाण होती. मात्र, याठिकाणी नीलगिरी वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड केल्यामुळे येथील खाण कोरडी झाली आणि तेथील जैवविविधता संपली.
आपल्याकडे माळरान, पाणथळ जागा आणि वनराई अशा तीन ठिकाणी पक्ष्यांचा रहिवास असतो. प्लॉटिंगमुळे शहरात माळरानेच राहिली नाहीत. पाणवठे बुजविण्यात आले आहेत. त्यामुळे स्थलांतरीत पक्ष्यांचे प्रमाण कमी झाले आहे. आपल्याकडे सुमंत सरोवर याठिकाणी गार्बियन, चक्रवाक, नकटा, थापट्या येतो. काही पक्षी मोशी याठिकाणी यायचे ते बंद झाले आहेत.
उमेश वाघेला (पक्षी निरीक्षक, अध्यक्ष, अलाईव्ह संस्था)