

तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणूक ही आता युतीतील राष्ट्रवादी काँग््रेास पार्टी आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे चित्र आज गुरुवारी (दि. 20) दिवसभरातील घडामोडींवरून दिसून येत आहे.
दोन्ही पक्षातील युतीच्या करत्याकरवीत्या नेत्यांविरोधात तालुकाभर नाराजीचा आवाज वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांमधील डावलले गेलेले अनेक इच्छुक उमेदवार, निष्ठावंत कार्यकर्ते यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवलेले बंडखोर यांना थंड करता करता या नेत्यांना आणि कोअर कमिटी सदस्यांना नाकीनऊ आल्याची माहिती एकंदरीत घडामोडींवरून समोर आली आहे. युती टिकविण्यासाठी नेत्यांची पळापळ सुरू असून, ते आपापल्या पक्षातील नाराज उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी उमेदवारांच्या घरोघरी भेटी घेत आहेत.
निवडणूक कार्यालयाच्या मीडिया सेल अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आजअखेर सात उमेदवारांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता 100 वैध अर्जांपैकी 89 अर्जधारक उमेदवार अजूनही निवडणुकीच्या रिंगणात टिकून आहेत. यापूर्वी चार जागांवर प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज असल्याने ती बिनविरोध होण्याची निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.
काल अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापासून युतीचे भवितव्य टांगणीला लागल्याचे चित्र समोर येत होते. अशातच दुखावलेल्या बंडखोर उमेदवारांना भेटून थंड करण्याची खलबते निष्फळ ठरत असताना युतीच्या करत्याकरवीत्यांचे धाबे दणाणले. बुधवारी रात्री उशिरापर्यंत याबाबत टोकाचे प्रयत्न सुरू होते. उद्या (दि. 21) अर्ज माघारीचा अखेरचा दिवस असल्याने राष्ट्रवादी काँग््रेास पार्टीने तातडीची पत्रकार परिषद आज दुपारी 12 वाजता बोलावली. मात्र, ती ऐन वेळेला रद्द केली. याबाबत पक्षाचे शहराध्यक्ष तथा कोअर कमिटी सदस्य सुरेश धोत्रे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की युती कायम रहावी म्हणून शेवटची बोलणी सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग््रेासचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
पुढारी वृत्तानंतर सोशल मीडियावर पोस्ट्सचा वर्षाव
तळेगाव दाभाडे निवडणुकीतील युती फुटीच्या मार्गावर जात असल्याचे वृत्त पसरताच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांच्या मार्मिक प्रतिक्रिया फेसबुक, इन्स्टाग््राामवर टाकण्याचा धडाका लावला. याचे पडसाद लोणावळा आणि वडगाव मावळ परिसरातील राजकीय वर्तुळात देखील उमटू लागले. पुढारी ऑनलाईनने सर्वप्रथम बेकिंग न्यूज प्रसारित केल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी दिलखुलासपणे पोस्टवर पोस्ट्सचा वर्षाव केला. युती समर्थक विरुद्ध युती विरोधक यांच्या पोस्ट्स आणि कमेंट्सचा खेळ दिवसभर होत.
युतीचा धर्म पाळण्याची जबाबदारी ज्या त्या नेत्यांची आहे. राष्ट्रवादीबाबत मी सर्वांना विश्वासात घेऊन सूचना दिल्या आहेत. आपण जर स्वतःला नेते समजत असू तर आपण आपल्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निवडणूक बिनविरोध करणे ही जबाबदारी घेतली पाहिजे. मी माझ्या पक्षातल्या संबंधित उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ते अर्ज मागे घेतील. परंतु भाजपची मंडळी अडवणूक करत असतील तर त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल.
सुनील शेळके, आमदार, मावळ