

वर्षा कांबळे
पिंपरी: परवाना मिळविल्याशिवाय श्वान व मांजर पाळू नये, असा सरकारी नियम आहे. तसेच, महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने 2022 पासून ऑनलाइन श्वान परवाना सोय उपलब्ध केली आहे. शहरात 5 हजारांहून अधिक जणांकडे श्वान आणि मांजर आहेत. तरीही केवळ 975 श्वान व मांजर मालकांनी परवाना घेतला आहे.
शहरात श्वान आणि मांजरप्रेमींची संख्या वाढत आहे. मात्र, अनेकजण श्वानांची महापालिकेत नोंदणी करत नाहीत. अनेकांना महापालिकेत जावून परवाना काढणे त्रासाचे वाटते. त्यामुळे महापालिकेने 4 ऑगस्ट 2022 पासून श्वानांची ऑनलाईन नोंदणी सुविधा सुरू केली आहे. मनपा कार्यालयात येऊन श्वान परवाना घेण्यास नागरिक फारसे उत्सुक नव्हते, असे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यानंतर 4 ऑगस्ट 2022 पासून आनलाइन श्वान परवाना उपलब्ध केला आहे. सुरुवातीला या सुविधेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. 2023 मध्ये 671 नागरिकांना ऑनलाइन अर्ज करून परवाना घेतला आहे. परवाना प्राप्त झाल्यापासून पुढील एक वर्षासाठी ऑनलाइन परवान्याची मुदत असते. त्यानंतर दर वर्षी परवान्याचे नूतनीकरण बंधकारक आहे.
विदेशी शिकारी श्वान अन् पर्शियन मांजर
शहरामध्ये अनेक नागरिकांना विदेशी शिकारी जातीचे श्वान आणि पर्शियन मांजर पाळण्याची हौस आहे. तर, काहीजण सुरक्षेसाठी अशा जातीचे श्वान पाळतात. हौसेपोटी व गरजेपोटी हजारो रुपयांना हे श्वान आणि मांजर विकत घेतले जातात. मात्र, त्यांच्या घाणीचा, केसांचा आणि भुंकणे आणि ओरडण्याचा शेजाऱ्या-पाजाऱ्यांना त्रास होतो. बऱ्याचदा पोलिसांकडेदेखील श्वानांच्या आणि मांजरांच्या विरोधात तक्रार दिली जाते. यासाठीदेखील हा परवाना घेणे गरजेचे आहे.
परवाना कसा काढायचा?
पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने हा परवाना दिला जातो. ऑनलाईन परवाना काढण्यासाठी अर्जामध्ये अर्ज क्रमांक, क्षेत्र, इमारतीचे नाव, श्वान मालकाचे नाव, ई मेल आयडी, पाळीव प्राण्याची माहिती, त्याचे नाव, रंग, वजन, लिंग, रेबीज प्रतिबंधक लसीकरण, पाळीव प्राण्याचा फोटो, अर्ज स्थिती, पैसे भरण्याची स्थिती असा तपशील असतो. ऑनलाईन सुविधा असल्याने आता घरबसल्या अर्ज करता येतो. नवीन परवान्यासाठी 75 रुपये शुल्क तर नूतनीकरणासाठी 50 रुपये मोजावे लागणार आहे.
परवाना नसेल तर दंडात्मक कारवाई
परवाना नसेल तर 500 रुपये दंड आकारण्यात आला आहे. श्वान आणि मांजराला रेबीज लसीकरण बंधनकारक असणार आहे. श्वान आणि मांजरापासून इतरांना त्रास होणार नाही, याची दक्षता परवानाधारकाने घेतली पाहिजे. स्वच्छतेच्या किंवा अन्य तक्रारी आल्यास परवाना रद्द करण्याचे अधिकार महापालिकेला राहतील. श्वान आणि मांजराने शेजाऱ्यांना त्रास दिल्यास मालकाविरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे शेजाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
शहरात जवळपास हजारांहून अधिक जणांकडे श्वान व मांजर आहेत. आम्ही नागरिकांना परवान्यासाठी आवाहन करत आहोत. नागरिकांमध्ये याबाबत जनजागृतीदेखील करण्यात येत आहे.
डॉ. अरुण दगडे, पशु वैद्यकीय अधिकारी, मनपा