

पिंपरी : राज्यात महाविकास आघाडीच्या काळात सुरू झालेली शिवभोजन थाळी शेवटच्या घटका मोजत आहे. सध्याच्या सरकारकडून ही योजना चालविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ही योजना गुंडाळणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पहिल्या टप्प्यात अनेक केंद्रांवर थाळीची संख्या कमी करण्यात आली होती. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून केंद्र चालकांना अनुदान मिळालेले नाही. विशेष म्हणजे या केंद्रांवर नियंत्रण असलेल्या अन्न पुरवठा विभागाकडून ही योजना सुरू राहण्याबाबतचे कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही.
कोरोनाच्या काळात या थाळीचा अनेक गरजूंना मोठा दिलासा मिळाला. तत्कालीन महाविकास आघाडीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी पाच रुपयांत शिवभोजन थाळी सुरू केली होती. त्यानंतर तिची किंमत वाढवून 10 रुपये करण्यात आली. दरम्यान, त्यातील काही अनुदान हे शासनाकडून देण्यात येत होते. शहरात सद्यस्थितीत 14 केंद्रे आहेत; मात्र त्यापैकी अनेक केंद्र चालकांना ही योजना परवडत नसल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
दरम्यान, अन्नपुरवठा विभागाच्या माध्यमातून या केंद्राचे नियंत्रण असल्याने पहिल्यांदा या केंद्र चालकांना वेळोवेळी बिले अदा केली जात होती. मात्र, गेल्या वर्षभरापासून या योजनांकडे दुर्लक्ष होत आहे. थाळ्यांची संख्या कमी करणे, अनुदान न देणे, केंद्रचालकांच्या समस्या ऐकू न घेणे अशा विविध कारणांमुळे ही योजना पुढे चालवायची की नाही, अशा मनःस्थितीमध्ये केंद्रचालक सापडले आहेत.
प्राधिकरणापासून ते अगदी एमआयडीसी कामगारांच्या सुविधेसाठी 14 केंद्र आहेत. त्यापैकी सर्वाधिक आठ केंद्र चिंचवडमध्ये आहे. तर, पिंपरीत 4 आणि भोसरीत सर्वात कमी म्हणजे 2 केंद्र आहेत; मात्र त्यापैकी प्रत्यक्षात अनेक केंद्रात थाळी वेळेपूर्वीच संपली असे सांगण्यात येते. परिणामी, अनेक केंद्र ही नावापुरती असून, अनुदान लाटत असल्याचे बोलले जात आहे.
केंद्र चालवताना अनुदानास उशीर होत असतानाही आर्थिक तोटा सहन करूनही आत्तापर्यंत थाळी वितरीत केली आहे; मात्र गेल्या चार महिन्यांपासून देयके थकल्याने केंद्र चालवणे जिकिरीचे होत आहे. अनुदान न मिळाल्यास केंद्र बंद करावे लागेल.
एकत्व फार्मर प्रोड्युसर, केंद्रचालक
केंद्रचालकांशी संपर्क सुरू आहे. थाळी योजना कोणीही बंद करणार नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत सर्वांची देयके वितरीत केली जातील. कोणाचीही रक्कम थकविली जाणार नाही. लवकरच देयके वितरीत केली जातील.
प्रशांत खताळ, अन्न पुरवठा अधिकारी, पुणे