

तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणूक आता युतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या आवक्याबाहेर गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही पक्षातील युतीच्या कर्त्याकरावीत्या नेत्यांविरोधात तालुकाभर नाराजीचा आवाज वाढला आहे. या दोन्ही पक्षांमधील नाराज इच्छुक उमेदवार, निष्ठावंत कार्यकर्ते आणि पेटून उठत उमेदवारी अर्ज कायम ठेवलेले बंडखोर यांना थंड करता करता या नेत्यांना आणि कोअर कमिटीला नाकीनऊ आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी पुढारीला दिली आहे.
युतीचे भवितव्य काल अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापासून टांगणीला लागल्याचे चित्र समोर येत होते. दुखावलेल्या बंडखोर उमेदवारांना भेटून थंड करण्याची खलबते निष्फळ ठरत असताना युतीच्या कर्त्याकरावीत्यांचे धाबे दणाणले. बुधवारी रात्री उशिरापर्यंत याबाबत टोकाचे प्रयत्न सुरू होते. उद्या (दि.21) अर्ज माघारीचा अखेरचा दिवस असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तातडीची पत्रकार परिषद आज दुपारी 12 वाजता बोलावली.
मात्र ती ऐन वेळेला रद्द करण्यात आली. याबाबत पक्षाचे शहराध्यक्ष तथा कोअर कमिटी सदस्य सुरेश धोत्रे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की युती कायम रहावी म्हणून शेवटची बोलणी सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.