

मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 17 लाख 12 हजार 151 मतदार आहेत. त्यात तब्बल 92 हजार 664 मतदार हे दुबार आहेत. तर, 999 मतदारांची नावे डिलिट करण्यात आली आहेत. त्यावरून शहरात बोगस मतदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुबार मतदारांची नावे उघड झाल्याने निवडणुकीत बोगस मतदान होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या मुद्द्यावरून महापालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.
पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि भोर विधानसभा मतदारसंघातील शहरातील 1 जुलै 2025 ला नोंद झालेल्या मतदार याद्या राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेस उपलब्ध करून दिल्या आहेत. शहरात एकूण 17 लाख 12 हजार 151 मतदार आहेत. त्यात 9 लाख 5 हजार 728 पुरुष, आठ लाख 7 हजार 966 महिला तर 197 तृतीयपंथी मतदार आहेत. त्या मतदार याद्या फोडून 1 ते 32 प्रभागनुसार प्रभागनिहाय यादी तयार करण्यात आली आहे. त्या याद्या गुरुवारी (दि. 20) प्रसिद्ध करण्यात आल्या. त्या दुबार मतदारांची यादीही देण्यात आली आहे.
दुबार मतदारांमुळे मतदारांची संख्या फुगली
प्रभागनिहाय मतदार यादी फोडल्यानंतर त्यात तब्बल 92 हजार 664 दुबार मतदार आढळून आले आहेत. एका मतदाराचे नाव यादीत तब्बल दोन वेळा आणि त्यापेक्षा अधिक वेळा आहेत. त्यामुळे शहरातील मतदारांची संख्या फुगली आहे. यादीचे अंतिम छाननी राज्य निवडणूक आयोगाकडूनही केली जाणार आहे. त्यात दुबार मतदारांची आणखी नावे आढळून येण्याची शक्यता आहे. परिणामी, दुबार मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
दुबार मतदार आढळून आल्याने शहरात बोगस मतदार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्या माध्यमातून निवडणुकीत बोगस मतदार केले जात असल्याच आरोप विरोधकांकडून केला जात आहे. हरकती व सूचनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुबार मतदारांचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. त्यावरुन निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या झडण्याची शक्यता आहे.
इच्छुकांची संख्या अधिक असल्याने हरकतींचा होणार भडीमार
शहरात एकूण 32 प्रभाग आहेत. सर्व प्रभाग एकमेकांना लागून आहेत. त्यामुळे प्रभागाच्या सीमेवर राहणाऱ्या लोकवस्ती, हाऊसिंग सोसायटी, इमारत, चाळीतील मतदारांची नावे शेजारच्या प्रभागाच्या मतदार यादीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे. प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मतदार यादीवर इच्छुकांसह त्यांच्या समर्थकांकडून तसेच, राजकीय पक्षांकडून सखोल चिकित्सा सुरू झाली आहे. प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात जोडल्यास किंवा गायब झाल्यास मोठ्या संख्येने हरकती घेण्यात येतील. त्यामुळे महापालिकेच्या निवडणूक विभागाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून दुबार मतदारांची नावेही शोधण्यात आली आहेत. ती एकूण संख्या 92 हजार 664 इतकी आहे. समान नावे असलेल्या या मतदारांची पडताळणी केली जाणार आहे. ती एकच व्यक्ती आहे की भिन्न हे तपासले जाणार आहे. एकच व्यक्ती असल्यासे दुबार मतदार म्हणून त्या मतदारांच्या नावापुढे दोन चिन्हे छापली जाणार आहेत. त्यामुळे त्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येईल. त्यासाठी त्यांच्याकडून हमीपत्र घेतले जाणार आहे.
विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
प्रभागनिहाय मतदार यादीची आम्ही तपासणी करत आहोत. महापालिकेने स्वत: 92 हजार 664 दुबार मतदार असल्याचे जाहीर केले आहे. त्यावरून मतदार यादी फुगवली असल्याचे स्पष्ट होत आहे. शहरात स्थायिक नसलेल्या नागरिकांची नावे मतदार यादी समाविष्ट केली आहेत. त्यातून बोगस मतदान केले जात असल्याचा दाट संशय आहे. हा व्होटचोरीचाच प्रकार आहे.
तुषार कामठे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष