

तळेगाव दाभाडे: दोन डिसेंबरला झालेल्या तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीने सजग मतदार, माजी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून तीव प्रतिक्रिया उमटल्या आहेत. फक्त 49.24 टक्के मतदान झाल्याने नागरिकांचा लोकशाही आधारित निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास कमकुवत झाल्याचा निष्कर्ष मतदान केलेल्या नागरिकांनी दैनिक पुढारीला दिलेल्या प्रतिक्रियांवरून समोर आला आहे.
नागरी विकासावर आधारित निवडणूक होण्याऐवजी या रणधुमाळीत पैशाच्या प्रभावाने, बिनविरोध जागांच्या वादांमुळे आणि मुद्द्यांशिवाय झालेल्या प्रचारामुळे मतदान जिल्ह्यात सर्वात कमी झाले. त्यातच सहा जागांची निवडणूक अद्याप रखडलेली असून, ती 20 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयीचे राजकारण आणि निवडणुकीवरील प्रशासकीय व्यवस्थापनाच्या संविधानिक अंमलबजावणीबाबत गंभीर आरोप नागरिक करत आहेत. तळेगाव दाभाडे नगर परिषदेची निवडणूक हा एक प्रकारे हायजॅकचा प्रकार असल्याचे मत बहुतांश मतदात्यांनी व्यक्त केले.
कमी मतदानाबद्दल तीव नाराजी
पुणे जिल्ह्यातील नीचांकी मतदान तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीत होण्याची ही पहिलीच वेळ आहे. लोकशाहीत जनाधाराला महत्त्व आहे. निम्म्यापेक्षा कमी मतदान झाल्याने उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. अनेक मतदारांनी सांगितले, की मतदान न करणारेही लोकशाहीला कमकुवत करण्यास राजकारण्यांपेक्षा तितकेच जास्त जबाबदार आहेत. फक्त निम्म्यापेक्षा थोड्या नागरिकांनी मतदान केल्याने उमेदवार, पक्ष आणि एकूणच निवडणूक व्यवस्थेबद्दल जनतेत निर्माण झालेली निराशा व्यक्त केली जात आहे. प्रदीर्घ लांबलेल्या निकालाचे औत्सुक्य केवळ नावाला उरले आहे.
राजकीय समीकरणे, आघाड्या आणि व्यक्तिकेंद्रित प्रचार यांच्यापुढे नागरी पायाभूत प्रश्न बाजूला सारले गेले असल्याचे जागरूक मतदारांनी ’पुढारी’शी बोलताना सांगितले. एकूणच, तळेगावची ही निवडणूक पैसा आणि राजकारण, मतदारांचा नीचांकी सहभाग आणि दुर्लक्षित नागरी प्रश्न यांसारख्या अनेक लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांपासून दूर गेल्याचे उघड करते. 20 डिसेंबरला होणारी पुढील निवडणूक या परिस्थितीत काही सुधारणा आणते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
बिनविरोध जागांवर प्रचंड टीका
या निवडणुकीत 18 नगरसेवक बिनविरोध निवडले गेले आहेत, ज्याला मतदारांनी अन्यायकारक, अलोकशाही असे संबोधले. अनेकांनी हे आर्थिक केंद्रित, दबाव आणि मतदारांना गृहीत धरण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला. सन 2028 मध्ये तळेगाव दाभाडे शहराचा विकास आराखडा 20 वर्षांनंतर नव्याने होत आहे. त्यामुळे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांपैकी किमान 7 जण बिल्डर लॉबीतील आहेत. यावर सोशल मीडियावरदेखील नेटकरी कडाडून टीका करत आहेत.
अपक्ष उमेदवारांचे कौतुक, लोकशाही जिवंत
काही मतदारांनी अपक्ष उमेदवारांनी मांडलेल्या दीर्घकालीन विकासाच्या संकल्पना, करदात्यांच्या हक्कांसाठीची भूमिका आणि नागरी व्यवस्थापनावरील मुद्द्यांचे स्वागत केले. त्यांनी लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम केल्याचे मत व्यक्त झाले.
प्रचारातून गायब असलेले मुद्दे
मतदारांनी निदर्शनास आणले की, पुढील महत्त्वाच्या योजना आणि समस्या जाहीरनाम्यात किंवा प्रचारात दिसल्याच नाहीत.
घनकचरा व्यवस्थापन
नगररचना आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी
नळ पाणीपुरवठा योजना
सांडपाणी व्यवस्थापन