

वडगाव मावळ: पर्चेस व्होटिंगचा फंडा ठरलेल्या वडगाव नगरपंचायत निवडणूक निकालाचा अंदाज लावताना दररोज नवीन आकडेमोड, नवीन अंदाज व्यक्त होत आहेत. दरम्यान, एकीकडे सगळेच वेगवेगळे तर्क लावण्यात व्यस्त असताना आता चक्क निवडणूक प्रक्रियेत सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांना विरोधी पक्षाचा उमेदवार विजयी झाल्याची स्वप्न पडू लागल्याने कार्यकर्त्यांच्या या स्वप्नाचीही चांगलीच चर्चा रंगली आहे.
वडगाव नगरपंचायत नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी नुकतीच 2 डिसेंबरला निवडणूक झाली. लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 तारखेला मतमोजणी होती. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी विजयाचा गुलाल उडणार होता. परंतु, अचानक न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे हा निकाल थेट 21 डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडला. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी लागणारा निकाल तब्बल 19 दिवस पुढे गेला आणि उमेदवार, कार्यकर्त्यांसह वडगावकरांचा हिरमोड झाला.
मतदान झाल्यापासून एकूण किती मतदान झाले, त्यात आपण किती पर्चेस केले होते, झालेल्या मतदारांना पुरुष किती, महिला किती? असे वेगवेगळे निकष लावून आकडेमोड करत प्रत्येकजण आपल्या पद्धतीने निकालाचा अंदाज लावताना दिसत आहे. दररोज नवीन अंदाज ऐकायला मिळत असून, अनेकांनी पैजाही लावल्या आहेत.
दरम्यान, हे सगळे सुरू असताना आता वडगावच्या निवडणुकीला स्वप्नांचाही फिव्हर लागल्याचे दिसत आहे. झाले असे.. वडगाव शहरातील एका चहाच्या दुकानावर भाजप, राष्ट्रवादी अशा दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते गप्पा मारत बसले होते. चर्चा साहजिकच निवडणूक आणि निकालाचीच सुरू होती. त्यात एका पक्षाचा कार्यकर्ता म्हणाला, मला रात्री स्वप्न पडले, मतमोजणी सुरू होती, नगरपंचायत कार्यालयासमोरच होतो, भंडारा उडत होता, मीही नाचत होतो, पण तो भंडारा विरोधी उमेदवाराचा आहे हे स्वप्नातच कळले आणि दचकून उठलो.
दुसऱ्या एका कार्यकर्त्याने तर थेट विजयी उमेदवाराला मिळालेली मतेही स्वप्नात दिसल्याचे सांगितले. याच स्वप्नांबाबत एका चौकात चर्चा रंगली असताना तिथेही एक कार्यकर्ता म्हणाला, मलाही स्वप्न पडले पण विजयी झालेला उमेदवार आमचा नव्हता. सकाळी उठल्यावर कळले आपण स्वप्न पाहिले होते, असे स्वप्नांचे किस्से सध्या वडगाव शहरात ऐकायला मिळत आहेत. एकंदर, न भूतो न भविष्यति अशा पद्धतीने केवळ पर्चेस व्होटिंगचा फंडा वापरून झालेली निवडणूक आणि दुसऱ्याच दिवशी लागणारा निकाला थेट 19 दिवस पुढे ढकलल्याने सर्वच उमेदवार टेन्शनमध्ये आहेत. कार्यकर्तेही आकडेमोड करण्यात व्यस्त आहेत. त्यात जवळपास महिनाभर निवडणूकमय वातावरण होते. त्यामुळे आता या निवडणुकीला स्वप्नांचा फिव्हर लागल्याचे दिसत आहे.