

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातून मेट्रोसेवेस प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे; तसेच मेट्रो प्रशासनाकडून प्रवाशांना सोयी-सुविधा पुरविण्यात येत आहेत; मात्र गेल्या काही दिवसांपासून मेट्रोच्या पीसीएमसी स्थानकांतील दोन तिकीट स्कॅनर मशीन बंद असल्याने गर्दीच्या वेळी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारंवारच्या ऑनलाईन तिकीट मशीनमधील बिघाड, सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे मेट्रो प्रवासी हैराण झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातून अनेक नोकरदार दररोज मेट्रोने पुण्यातील कार्यालय गाठतात; तसेच अनेक लोक विविध कामासाठी पुण्यात जातात. त्यामुळे सकाळी मेट्रो स्थानकात तिकीट काढण्यासाठी तिकीट काऊंटरवर मोठी गर्दी होते. मात्र अनेकवेळा मेट्रो स्थानकांतील सर्व्हर डाऊनच्या समस्या, ऑनलाईन तिकीट मशीनमधील बिघाड यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांना तिकीट काऊंटरसमोर रांगा लावाव्या लागतात. परिणामी अनेकांना आपले कार्यालय वेळेत गाठता येत नाही.
स्कॅनर मशिनमध्ये वारंवार बिघाड
ऐन गर्दीच्या वेळी ऑनलाईन तिकीट मशिनमध्ये बिघाड झाल्यासे प्रवाशांना तिकिटासाठी धावपळ करावी लागते. पीसीएमसी मेट्रो स्थानकांतील निगडीच्या बाजूकडील प्रवेशद्वाराजवळ पाच ऑनलाईन स्कॅनिंग मशिन आहेत. यापैकी दोन मशिन बंद असल्याने प्रवाशांना स्थानकातून बाहेर पडण्यासाठी वेळ लागतो.
मेट्रो स्थानकांतील तिकीट स्कॅनिग मशीनमध्ये बिघाड निर्माण झाल्यामुळे प्रवाशी मेट्रो स्थाकांतून बाहेर पडण्यासाठी रांगा लावाव्या लागतात. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर मशीन दुरुस्त करावे. मशिन नादुरुस्त असल्याबाबतच्या तक्रारीदेखील आम्ही प्रशासनाकडे केल्या आहेत.
श्रुती हगवणे, प्रवासी
तिकीट स्कॅनर मशिनचे अद्ययावतीकरण सुरू असल्याने मशीन बंद होते; मात्र आता ती यंत्रणा सुरळीत झाली आहे. त्यामुळे येथून पुढे प्रवाशांना तिकीट स्कॅन करताना गैरसोय होणार नाही.
चंदशेखर तांबवेकर, जनसंपर्क अधिकारी महामेट्रो