

वडगाव मावळ : तुम्ही माझ्या विरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल करा, मी न्यायालयात पुरावे सादर करतो; तसेच पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांकडे लेखी तक्रार करणार व अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यांकडे सर्व पुरावे देणार, असा इशारा देत आमदार सुनील शेळके यांनी मावळ तालुक्यातील भाजप नेत्यांना पुन्हा एकदा खुले आव्हान दिले आहे.
सोमवारी वडगाव मावळ येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग््रेासच्या कृतज्ञता मेळाव्यात बोलताना आमदार शेळके यांनी तालुक्यातील भाजप नेत्यांनी उमेदवारांकडून ईव्हीएम मशीन हॅकच्या नावाखाली लाखो रुपये उकळले असल्याचा गंभीर आरोप करत गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर माजी राज्यमंत्री संजय भेगडे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार शेळके यांनी केलेले आरोप फेटाळून 8 दिवसांत आरोप सिद्ध करा, अन्यथा अबुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता.
यावर आज आमदार शेळके यांनी पत्रकारांशी बोलताना तुम्ही माझ्यावर अबुनुकसानीचा दावा दाखल करा, मी न्यायालयात पुरावे सादर करील, असे स्पष्ट करत पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांकडे लेखी तक्रार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबतचे पुरावे देणार असल्याचे सांगितले. एकप्रकारे आमदार शेळके यांनी पुन्हा एकदा भाजपच्या स्थानिक नेत्यांना खुले आव्हान दिले आहे.
दरम्यान, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी आमदार शेळके यांच्यावर केलेल्या टीकेबाबत पत्रकार परिषदेत बोलताना मावळ तालुका राष्ट्रवादी काँग््रेासचे प्रवक्ते राज खांडभोर यांनी आमदार शेळके किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केलेल्या टीकेला जशाच तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा देऊन तालुक्याला प्रबळ विरोधकांची गरज आहे. त्यामुळे गणेश भेगडे यांनी राजकीय सन्यास घेऊ नये, असा टोलाही लगावला.
याप्रसंगी आमदार शेळके यांनी पुणे जिल्ह्यात ईव्हीएम हॅकर्सचे मोठे रॅकेट असल्याचा खळबळजनक दावा केला असून, हे हॅकर्स निवडणूक काळात काही उमेदवारांना हेरतात व ईव्हीएम मशीन हॅक करण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचे डील करतात. यामध्ये विजय झाला तर पैसे त्यांना आणि पराभव झाला तर पैसे परत असा प्रकार असतो. अशाच हॅकर्सच्या टोळीला मावळातील भाजपचे नेते भेटले, उमेदवारांनी त्यांना पैसे द्यायचे, उमेदवार विजयी नाही झाला तर पैसे परत मिळणार असे डील केल्याचा आरोप शेळके यांनी केला.
आमदार शेळके म्हणाले, मी तालुक्याचा एक प्रतिनिधी असल्याचा भान ठेवून जबाबदारीने वक्तव्य करत असतो. ज्या उमेदवारांनी पैसे दिले त्यांच्याच जवळच्यांनी मला पुरावे दिले आहेत. मी पुराव्यानिशी बोलतो. मी खोटे आरोप करत नाही. आरोप खोटे निघाल्यास तुम्ही सांगतील त्या चौकात पाय धरून जाहीर माफी मागेल, असेही स्पष्ट केले.