

पिंपरी: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी शिष्यवृती परीक्षा रविवार (दि. 22) होत आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरात 44 केंद्रांवर इयत्ता पाचवीचे 9542 विद्यार्थी तर 30 केंद्रांवर इयत्ता आठवीचे 5965 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
परीक्षेसाठी 74 केंद्र संचालक, 12 सह केंद्रसंचालक, 765 पर्यवेक्षक व 199 शिपाई यांची नेमणूक करण्यात आली आहे. या परीक्षेला महापालिका, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायीत शाळांतील विद्यार्थी परीक्षा देतात. मराठी, इंग्लिश, हिंदी व उर्दू या चार माध्यमातून परीक्षा देता येते.
परीक्षेसाठी दोन पेपर असून विद्यार्थ्यांनी सकाळी दहा वाजता संबंधित परीक्षा केंद्रावर हजर रहावे. पहिला पेपर प्रथम भाषा व गणित असून सकाळी 11:00 ते 12:30 या वेळेत होणार आहे. दुसरा पेपर तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी दुपारी 2:00 ते 3:30 या वेळात होणार आहे. परीक्षार्थ्याला दोन्ही पेपर देणे अनिवार्य आहे.
प्रत्येक पेपरमध्ये 75 प्रश्न असून बहुपर्यायी उत्तरामधून योग्य पर्यायाचे वर्तुळ रंगवायचे आहे. वर्तुळ रंगविण्यासाठी काळ्या किंवा निळ्या बॉल पेनचाच वापर करावयाचा आहे. जेल पेन, शाई पेन, पेन्सिलचा वापर वर्तुळ रंगविण्यासाठी करू नये. प्रत्येक प्रश्नच्या योग्य उत्तराला 2 गुण दिले जाणार आहेत. परीक्षेस पात्र होण्यासाठी किमान 40 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकावर होणार असल्याने विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका काळजीपूर्वक हाताळाव्यात आदी सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.
परीक्षार्थींसाठी महत्त्वाचे
परीक्षेची वेळ : पहिला पेपर - सकाळी 11 ते 12. 30; दुसरा पेपर - दुपारी 2 ते 3.30
परीक्षार्थीला दोन्ही पेपर देणे अनिवार्य
प्रत्येक पेपरमध्ये बहुपर्यायी 75 प्रश्न
योग्य पर्यायाचे वर्तुळ रंगविण्यासाठी निळ्या अथवा काळ्या बॉल पेनचाच वापर करावा