

खराळवाडी: उद्योगनगरीतील महत्त्वाची बाजारपेठ म्हणून पिंपरी मार्केटकडे पाहिले जाते. येथील मार्केटमध्ये शहराच्या विविध कानाकोपऱ्यातून तसेच आजूबाजूच्या गावांतूनदेखील नागरिक खरेदीसाठी येतात. यामुळे येथे दररोज वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यात सुटीच्या दिवशी तर येथे माणसे आणि वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यात सिग्नल यंत्रणा बंद पडली तर वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणावर त्रास नागरिक व वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. यामुळे शगुन चौकातून प्रवास नको रे बाबा म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
पिंपरीत शगुन चौकामधील वाहतूक नियंत्रक सिग्नल गेले काही दिवसांपासून बंद असल्याने या रस्त्यावर वाहतूककोंडी होत आहे. पिंपरी, काळेवाडी, राहाटणीकडे जाणारा रस्ता शगुन चौकामधून जातो. येथील सिग्नल गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. यामुळे रस्त्यावर सकाळ, संध्याकाळी वाहतूककोंडी होत आहे. सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे वाहनचालक नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीत. यामुळे काही मिनिटांचा प्रवास तास, अर्धा तास गेला तरी पूर्ण होत नसल्याने वाहनचालक त्रस्त आहेत. चौकात वाहने एकमेकांसमोर आल्याने वाहतूककोंडी होते. पिंपरी चौक, मोरवाडी चौकातून थेट शगुन चौकात वाहतूक रहदारी चालू असते. या वाहतूक रहदारीला कंट्रोल करण्याचे काम सिग्नल यंत्रणा कारीत असते; परंतु ही सिग्नल यंत्रणा गेले काही दिवस झाले बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
शगुन चौक हा पिंपरी बाजारपेठेतील मुख्य चौक आहे. या बाजारपेठेत खरेदीसाठी नेहरूनगर, संत तुकारामनगर, वल्लभनगर, यशवंतनगर, वास्तू उद्योग, अजमेरा, अंतरीक्ष सोसायटी, लालटोपीनगर, पिंपरीगाव, काळेवाडी फाटा, थेरगाव, या परिसरातील नागरिक खरेदीसाठी येतात. शगुन चौकात आल्यानंतर सिग्नल सुरू असल्यास वाहतूक नियंत्रण योग्य पद्धतीने होते. मात्र, सिग्नल बंद असल्याने वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवतात. त्यामुळे शगुन चौकात वाहतूककोंडी होते. शगुन चौकातील सिग्नल त्वरित सुरू करावा, अशी मागणी वाहनचालकांसह नागरिकांनी वाहतूक विभागाकडे केली आहे.
चौकाला अतिक्रमणांचा विळखा
शगुन चौकात मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे रस्ता रहदारीस अरुंद झाला असून, वाहतूक कोंडीत भर पडत आहे. एकीकडे सिग्नल यंत्रणा बंद तर दुसरीकडे चौकातील तसेच रस्त्यावरील अतिक्रमण यामुळे येथून प्रवास करणे कठीण झाले आहे. वाहतूक विभाग आणि महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने याकडे लक्ष देऊन येथील वाहतूक सुरळित करण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे.
पिंपरी बाजारपेठेत वाहतूक रहदारी मोठ्या संख्येने असल्याने येथील सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची गरज आहे. तरच वाहतूक नियंत्रणात ठेवता येईल. अन्यथा थोड्यावेळ वाहतूक नियंत्रण करणारे कर्मचारी बाजूला गेले की वाहतूक कोंडी होत आहे.
बाळासाहेब चाबुकस्वार, दुचाकी वाहनचालक.
खरेदीसाठी पिंपरी बाजारपेठेत आल्यावर रस्ता ओलांडताना वाहने सरळ अंगावर येतात. सिग्नल यंत्रणा सुरू असल्यास वाहतूक रहदारी सुरळीत राहील. पादचाऱ्यांना मार्ग बदलताना अपघात होणार नाहीत. बंद सिग्नलमुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन वाहनांना चुकवत रस्ता क्रॉस करावा लागत आहे.
भीमराव कांबळे, माजी सैनिक
सिग्नल यंत्रणा बंद पडलेली आहे. तसे संबंधित विभागाला कळवले आहे; परंतु अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. तरी बंदोबस्त संपताच त्याची कार्यवाही करण्याची शिफारस केली जाईल.
वर्षा पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, पिंपरी