Pimpri School Van Rickshaw Student Safety: पिंपरीत स्कुल व्हॅन–रिक्षांचा खेळखंडोबा! क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवून प्रवास
हेमांगी सूर्यवंशी
पिंपरी: विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा आणि व्हॅन चालकांकडून होणारी मनमानी पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. तसेच सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना घेऊन जात असल्याचे चित्र शहरात सर्रास पाहायला मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
अनेक पालकांना स्कुल, व्हॅनचे दर परवडत नसल्याने पालकांकडून रिक्षा किंवा लहान आकाराच्या व्हॅनला पसंती दिली जात आहे. मात्र काही व्हॅन रिक्षाचालकांना रिक्षेच्या क्षमतेपेक्षा आधिक विद्यार्थी बसवून वाहतूक केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्याच्या जीवाशी खेळ होत आहे. याकडे वाहतूक पोलिस, प्रादेशिक परिवहन आधिकाऱ्यांकडून पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात शिक्षण, नोकरीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येथे स्थायिक झालेले आहेत. त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी शहरात शाळांची संख्याही मोठी आहे; मात्र अनेक पाल्यांचे पालक नोकरीनिमित्त घराबाहेर असल्याने त्यांना पाल्यांना शाळेतून ने-आण करण्यासाठी स्कूल बस सुविधा घेतात; मात्र काही पालकांना स्कूल बसचे दर परवडत नसल्याने व्हॅन अथवा रिक्षाची सुविधा घेतात. पालकांकडून किफायतशीर वाटणाऱ्या लहान आकारच्या व्हॅन, रिक्षामधून क्षमतेपेक्षा आधिक विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहतुक पोलिस, प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वेळोवेळी नियमावली जाहीर केली जाते. बसमधील अनधिकृत संस्थेचे दोन प्रमाणपत्रे, आग्निशमन यंत्रण, प्रथोपचार संच इत्यादी वस्तू असणे बंधनकारक आहे. ्रप्रादेशिक परिवहन विभागांकडून मोठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. परंतु खाजगी व्हॅन, रिक्षाचालकांकडून नियामाचे पालन न केल्याचे आढळून येत आहे.
पालकांनो तुमची मुले सुरक्षित आहेत का
स्वस्त दरात मिळणाऱ्या सेवेच्या आहारी पालकांनी जाऊ नये. कारण लहान आकाराच्या व्हॅन; तसेच रिक्षांमध्ये बसताना मुलांना दाटीवाटीने बसावे लागते. अथवा उभे राहून प्रवास करावा लागतो. तसेच अनेक व्हॅन, रिक्षाचालक वाहने बेदरकरारपणे चालवतात. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही; तसेचविद्यार्थ्यांच्या जीव धोक्यात येवू शकतो.
चालकांसाठी नियमावली
चालक हा प्रशिक्षीत असावा असावा. त्याला पाच ते दहा वर्षाचा वाहन चालवण्याच अनुभव असणे बंधनकारक आहे; तसेच चालकाने वाहन चालवताना धुम्रपान अथवा व्यसन करू नये.
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे; तसेच लहान मुलांना पुढच्या सीटीवर बसवून वाहतूक करणे चुकीचे आहे. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसविल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
संतोष उबाळे, बघतोय रिक्षावाला फोरम महाराष्ट्र राज्य सरचिटणीस
वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वळोवेळी कारवाई केली जाते. तसेच पालकांनी विद्यार्थी वाहतुकीसाठी आधिकृत वाहनांची सुविधा घ्यावी. जेणेकरुन आपला पाल्य सुरक्षित राहील. शाळेने देखील संबंधित वाहनांच्या चालकावर लक्ष ठेवावे; तसेच चालकांविषयी पूर्ण खात्री झाल्याशिवाय कामावर ठेवू नये.
राहुल जाधव, उपप्रादेशिक अधिकारी, पिंपरी-चिंचवड

