

पुणे : 'ज्ञान प्रबोधिनी'चे संस्थापक कार्यकर्ते, ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचे पहिले प्राचार्य आणि संत्रिका विभागाचे मार्गदर्शक यशवंतराव लेले (वय ९५) यांचे अल्पशा आजाराने रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि कन्या असा परिवार आहे.
लेले यांचे पार्थिव सोमवारी (दि. ८ डिसेंबर) सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळेत सेनापती बापट रस्त्यावरील निवासस्थानी आणि त्यानंतर दहा वाजता ज्ञान प्रबोधिनीच्या उपासना मंदिरामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
लेले यांचे वाई येथील प्राथमिक शाळेत आणि पुढे द्रविड हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झाले. अकरावी मॅट्रिकचे केंद्र वाईला नसल्यामुळे ती परीक्षा देण्यासाठी म्हणून ते १९४८ मध्ये ते पुण्याला आले. बरोबरीचे मित्र संघाच्या शाळेत जाणारे असल्याने यशवंतराव यांच्यावर संघ संस्कार झाले. सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी करतानाच त्यांनी बी. ए., बी. टी. आणि एम. ए. पूर्ण केले. ते पुढे शिक्षकी पेशाकडे वळले.
नानावाडा येथील कर्मवीर भाऊसाहेब पाटील आणि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकविल्यानंतर त्यानंतर मात्र त्यांनी कायमस्वरूपी नोकरीचा त्याग करून आप्पा पेंडसे यांच्यासवेत पूर्णपणे ज्ञान प्रबोधिनीला वाहून घेतले.
प्रबोधिनीचे आप्पा पेंडसे यांचे काही प्रयोग 'राष्ट्र जागृती मंडळ' या अनौपचारिक रचनेतून झाले. त्यापाठोपाठ विविध शाळेतील बुद्धिमान मुले निवडून त्यांच्यासाठी प्रबोध शाळा चालू करण्यात आले. या दोन्ही उपक्रमात यशवंतराव हे सहभागी झाले होते. यशवंतराव हे ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचे पहिले प्राचार्य. १९६९ पासून १९७५ पर्यंत त्यांनी ही जबाबदारी पार पाडली. त्यापूर्वी १९६६ पासून यशवंतराव प्रबोधिनीचे कार्यवाह म्हणून कार्यरत होते. पुढे जून १९७५ मध्ये ज्ञान प्रबोधिनी मुलींच्या पहिल्या तुकडीचे ते वर्गशिक्षक होते. वयाच्या पंचाहत्तरीत म्हणजे २००५ मध्ये ते औपचारिक जबाबदारीतून मुक्त झाले, असे असले तरी तेव्हापासून आजतागायत ते ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते.