

संतोष शिंदे
पिंपरी: मद्यप्राशन करून वाहन चालवण्याच्या बेफिकीर कृत्यामुळे शहरात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. नुकतेच एका मद्यधुंद चालकाने चिरडल्याने एकाच घरातील तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने संपूर्ण शहराला हादरवून सोडले असून मद्यपी चालकांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान ‘पुढारी’ने घेतलेल्या आढाव्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे ब्रिथ ॲनालायझरचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे.
केवळ 21 ब्रिथ ॲनालायझरवर मदार
पिंपरी-चिंचवड शहर वेगाने वाढणारे, औद्योगिक व आयटी पट्ट्याने व्यापलेले शहर आहे. शहरात रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरू असते. तसेच, महामार्गांवर नेहमी वर्दळ असते. शहरातील बार-रेस्टॉरंटमधून बाहेर पडलेले हजारो मद्यपी चालक रस्त्यांवर फिरतात. मात्र, या चालकांची तपासणी करण्यासाठी शहर पोलिसांकडे केवळ 21 ब्रिथ ॲनालायझर उपलब्ध असल्याने मद्यपी चालकांना रोखायचे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तीन हजार चालकांवर कारवाई
साधनसामग्री मर्यादित असतानाही वाहतूक पोलिसांनी विशेष मोहिमा राबवून मागील आठ महिन्यांत 3,004 चालकांना दारू पिऊन वाहन चालवताना पकडले आहे. प्रत्येक प्रकरणात अल्कोहोलचे प्रमाण कायदेशीर मर्यादेपेक्षा अधिक आढळून येत असून दंड, न्यायालयीन कारवाई आणि परवाना निलंबनाची प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
जनजागृती मोहिमांनाही प्रतिसाद
वाहतूक विभाग ‘एक दिवस शाळेसाठी’सारख्या मोहिमेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये वाहतूक नियमांची जनजागृती करत आहे. शहरातील 20 पथके नियमितपणे शाळा, कंपन्या आणि वसतिगृहांमध्ये जाऊन नियमांचे धडे देत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण होत आहे.
दहापैकी एक अपघात हा मद्यपी चालकांमुळे
दारू मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते, दृश्य व मानसिक समन्वय ढासळतो आणि वाहनाचा वेग नियंत्रणात राहत नाही. देशातील प्रत्येक दहापैकी एक अपघात हा मद्यपी चालकामुळे घडतो. पिंपरी-चिंचवडसारख्या गजबजलेल्या शहरात हा धोका अधिक तीव्र असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे.
उपकरणांची संख्या अपुरी
उपकरणांची संख्या अत्यंत अपुरी असल्याने अनेक धोरणात्मक ठिकाणी नाकाबंदी करणे शक्य होत नाही. शहरातील विस्तार आणि वाहतुकीचे जाळे लक्षात घेता किमान दोन ते तीन पट अधिक उपकरणांची गरज असल्याचे मत जाणकार यांच्याकडून व्यक्त होत आहे.
कायदा आणि शिक्षेचे परिणाम
भारतीय मोटार वाहन कायद्यानुसार 100 मिलीलीटर रक्तात 30 मिलीग्रामपेक्षा अधिक अल्कोहोल आढळल्यास तो गुन्हा मानला जातो. पहिल्याच गुन्ह्यात दंड किंवा सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे. पुनरावृत्ती झाल्यास शिक्षा आणखी कडक होते. अलीकडेच हिंजवडीत झालेल्या प्रकरणात एका चालकाला 10 हजारांचा दंड आणि सिग्नलवर जनजागृती पत्रके वाटण्याची सामाजिक शिक्षा देऊन न्यायालयाने कठोर भूमिका दर्शविली.
दारू पिऊन वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा आहे. अपघातांमधील मृत्यूंच्या आकडेवारीत हे चिंतेचे कारण बनले आहे. नागरिकांचे प्राण वाचवणे हा आमचा प्रमुख उद्देश असून रात्री नाकाबंदी, तपासणी आणि जनजागृती मोहिमा सातत्याने सुरू आहेत. वाहतूक विभागाकडे असलेल्या 21 ब्रिथ ॲनालायझर मदतीने ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाया सुरु आहेत.
डॉ. विवेक पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतुक विभाग, पिंपरी-चिंचवड