Pudhari Mawal Gaurav Awards: मावळ तालुक्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा ‘पुढारी मावळ गौरव’ पुरस्काराने सन्मान
तळेगाव दाभाडे : सोमवार, दि. 13 ऑक्टोबर... वेळ : सूर्याच्या मावळतीची... ठिकाण : वडगाव मावळ... जांभूळ फाटा येथील शिवराज पॅलेसचा खचाखच भरलेला हॉल... त्यात मावळवासीयांचा अमाप उत्साह... निमित्त होते ‘पुढारी मावळ गौरव सन्मान’ समारंभाचे... अशा प्रसन्नमय वातावरणात आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविलेल्या मावळातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. (Latest Pimpri chinchwad News)
या वेळी आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समिती आणि आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त योगी निरंजननाथ महाराज, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, सरसेनापती दाभाडे यांचे वंशज सत्येंद्रराजे दाभाडे सरकार हे प्रमुख पाहुणे म्हणून, तर दैनिक पुढारीचे निवासी संपादक सुनील माळी, सहयोगी संपादक सुहास जगताप, पिंपरी-चिंचवड आवृत्तीप्रमुख किरण जोशी आणि वितरण व्यवस्थापक विजय जाधव हे व्यासपीठावर उपस्थित होते.
समाजकारण, राजकारण, शिक्षण, उद्यम-व्यवसाय, सहकार, वैद्यकीय तसेच क्रीडा आणि शासकीय सेवा आदी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजाविलेल्या मावळातील कर्तव्यनिष्ठांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ‘पुढारी मावळ गौरव’ सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले. त्या वेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली. शाल, सन्मान ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ, असे पुरस्काराचे स्वरूप होते. मावळचे शाहीर मंगेश साळुंखे यांनी पहाडी आवाजात सादर केलेल्या पोवाड्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पाहुण्यांच्या हस्ते श्री गणेशपूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.
मावळातील कर्तृत्ववान, कर्तबगार आणि समाजासाठी मोठे योगदान दिलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी दै. पुढारीने हाती घेतलेल्या या प्रेरणादायी उपक्रमाचे यंदाचे हे तिसरे वर्ष होते. सन्मानित करण्यात येणाऱ्या पुरस्कारार्थींचे कर्तृत्व, जीवनकार्य आणि त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाची माहिती असलेल्या पुढारी विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते या वेळी करण्यात आले.
दै. पुढारीने वृत्तपत्र, टीव्ही चॅनेल, रेडिओ, डिजिटल या माध्यम क्षेत्रांत राज्यात घेतलेली आघाडी आणि त्याचबरोबर उपक्रमशीलतेचे राखलेले सातत्य, याचा आढावा घेत निवासी संपादक सुनील माळी यांनी मावळातील पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले. सहयोगी संपादक सुहास जगताप यांनी मावळ गौरव सन्मान उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करीत मावळ तालुक्यातील दैनिक पुढारीच्या वार्ताहर चमूचे कौतुक केले. स्वागत, प्रास्ताविक किरण जोशी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मण शेलार यांनी केले. पुढारी मावळ तालुका प्रमुख वार्ताहर गणेश विनोदे यांनी आभार मानले.
यंदा सन्मानित करण्यात आलेले पुढारी मावळ गौरव पुरस्कारार्थी याप्रमाणे : 1) अविनाश असवले, 2) ब्रिंदा गणात्रा, 3) डॉ. दत्तात्रय गोपाळघरे, 4) हरिश्चंद्र गडसिंग, 5) हर्षल पंडित, 6) ऋषिकेश गिरी, 7) जय दाभाडे, 8) केतन ओसवाल, 9) कल्याणी लोखंडे, 10) किरण गायकवाड, 11) महादेव खरटमल, 12) मनोज स्वामी, 13) नंदकुमार वाळंज, 14) निखिल भगत, 15) ओम जगनाडे, 16) डॉ. प्रफुल्ल काशीट, 17) परेश मुथा, 18) प्रशांत भागवत, 19) प्रदीप पवार, 20) रूपाली मुऱ्हे, 21) आर. टी. धामणकर, 22) राजू खांडेभरड, 23) सोनाली जगताप, 24) सायली बोत्रे, 25) संकेत शिंदे, 26) संतोष भिलारे, 27) सुनील पवार, 28) सुरेश कार्लेकर, 29) सचिन भांडवलकर, 30) शुभम कुल, 31) वसंत पवार, 32) विशाल शेटे 33) राजेंद्र दळवी, 34) डॉ. विकास जाधवर, 35) विवेक गुरव व शाहीर मंगेश साळुंखे यांनाही विशेष गौरव पुरस्कार देण्यात आला.
मावळ तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सोमवारी ‘पुढारी मावळ गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. -
दैनिक पुढारी वृत्तपत्राने जपलेली सामाजिक बांधिलकी आणि पत्रकारिता लोकांमधील संवादाला सतत प्रवाहित करीत राहिली आहे. ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवबा मावळची खरी ओळख आहे. ‘पुढारी’ला मावळचा चांगलाच अभ्यास झाला आहे. त्यामुळे त्यांनी शोधून काढलेल्या रत्नांना दिलेला पुरस्कार त्यांच्या तपश्चर्येचे कौतुक आहे. त्यातून अधिक जोमाने पुढे जात अखेर जीवनगौरव पुरस्कारापर्यंत जायची प्रेरणा मिळणार आहे.
योगी निरंजननाथ महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समिती, आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त
दैनिक पुढारी समूहाचे या मावळच्या भूमीशी एक नाते जडले आहे. दोन हजार वर्षांचा इतिहास असलेल्या मावळातील कर्तबगारांच्या या सोहळ्यात भक्ती आणि शक्तीचा समावेश आहे. अशाच अधिकार व्यक्तीच्या (योगी निरंजननाथ महाराज) हस्ते सरसेनापती घराण्यातील सत्येंद्रराजे दाभाडे सरकार आणि पुढारीचे निवासी संपादक सुनील माळी, सुहास जगताप, किरण जोशी, विजय जाधव यांच्या साक्षीने या पुरस्कारांचे विशेष असे महत्त्व आहे.
पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहास संशोधक
दै. पुढारीकडून दिला जाणारा पुरस्कार हा प्रेरणादायी असून, त्यापासून ऊर्जा घेत पुरस्कारार्थी अधिक जोमाने समाजात काम करीत राहतील. विद्वानांच्या हस्ते तो देण्यात येतोय, हे महत्त्वाचे. दैनिक पुढारीचा हा उपक्रम अत्यंत चांगला आहे, त्याबद्दल सर्व मावळवासीयांतर्फे दैनिक पुढारीचे मी आभार व्यक्त करतो.
सत्येंद्रराजे संग्रामसिंहराजे दाभाडे सरकार

