

पिंपरी : सक्षम आणि व्यापक आरोग्य सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारच्या 15 व्या वित्त आयोगातून आयुष्मान भारत योजनेअंतर्गत शहरात 79 ठिकाणी आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये जिजाऊ क्लिनिक विलीन केली जात असून आतापर्यंत शहरातील 36 ठिकाणी केंद्रांचे काम पूर्ण झाले आहे.(Latest Pimpri chinchwad News)
खासगी रुग्णालयात उपचार घेणे, सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाही. खासगी वैद्यकीय सेवा-सुविधा दिवसेंदिवस महागड्या होत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांना सर्वसामान्य नागरिक प्राधान्य देऊ लागले आहेत. पालिकेच्या रुग्णालयातील बाह्य रूग्ण विभागात दररोज 12 हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात पालिकेची 10 मोठी रुग्णालये, 28 दवाखाने, 20 आरोग्य केंद्र, 8 कुटुंब नियोजन केंद्र, 36 लसीकरण केंद्र आहेत. त्यामध्ये आता आरोग्यवर्धिनी केंद्रांची भर पडली आहे.
पालिकेचे प्राथमिक दवाखाने प्रामुख्याने लहान आजारांवरील तपासणी व औषधे पुरवतात; तर जिजाऊ क्लिनिकमध्ये स्त्रीरोग तपासणी, माता-बाल आरोग्य, लसीकरण यावर भर दिला जातो; परंतु नागरिकांना सर्वसमावेशक आरोग्य सेवा एकाच छताखाली मिळावी, यासाठी आरोग्यवर्धिनी केंद्र ही नवी संकल्पना राबवली जात आहे. या 36 केंद्रांतील डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. आठ आरोग्यवर्धिनी केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर 24 चे काम 50 टक्के झाले आहे. यामधील काही आरोग्यवर्धिनी केंद्रे डिसेंबरपर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञ यांची नेमणूक केली जाणार असून आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल. त्यात प्रत्येक केंद्रावर एक डॉक्टर, एक परिचारिका, एक केमिस्ट आणि एक वर्ग, चारचा कर्मचारी उपलब्ध करून जाणार आहे.
आतापर्यंत 36 ठिकाणी ही केंद्रे सुरू झाली आहेत. काही ठिकाणी जागेच्या समस्या येत आहे. त्या समस्या सोडवून डिसेंबरपर्यंत पूर्ण क्षमतेने सर्व ठिकाणी केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे. या केंद्रांमुळे रुग्णांना तत्काळ उपचार आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मिळतील.
डॉ. लक्ष्मण गोफणे (आरोग्य वैद्यकीय अधिकारी)
सर्वसामान्य तपासणी करता येणार
प्रयोगशाळेतील तपासण्या, तातडीचे उपचार शक्य
औषध वितरणासह दंत तपासणी असे विविध उपचार होणार
रुग्णांवर अल्प खर्चात सुलभ उपचार