

पिंपरी : दिवाळीनिमित्त मूळगावी जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेता राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांच्या सुविधेसाठी 598 विशेष बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत या बसेस सोडल्या जाणार आहेत. यंदा वल्लभनगर आगारातूनही ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांचा पुणे शहरात जाण्याचा ताण कमी होणार आहे.(Latest Pimpri chinchwad News)
पुणे व पिंपरी शहरात प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भातील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दिवाळीसाठी या भागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता एस. टी. महामंडळाकडून जादा बस सोडण्यात येत आहेत.
दिवाळीनिमित्त दरवर्षीप्रमाणे खडकी कॅन्टोन्मेंट परिसरातून मराठवाडा, विदर्भासाठी विशेष बसेस सोडण्यात येतात; परंतु यंदा खडकी येथील परिसरात जागा उपलब्ध नसल्याने एसटी महामंडळाने नवीन जागेचा शोध घेतला आहे. वाकडेवाडी बस स्थानकासमोर ’आरे’ची जागा देण्याची मागणी एस. टी. प्रशासनाच्यावतीने करण्यात आली होती, परंतु ही जागा पीएमआरएडीच्या ताब्यात असल्याने ही जागा एस. टी. ला देण्यात आलेली नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर आगारातून विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणाहून सोडल्या जाणाऱ्या बसेसच्या पार्किंगसाठी मैदान भाड्याने घेण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी 113 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेच, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या भागातील प्रवाशांसाठी स्वारगेट येथून गाड्या सोडण्यात येणार असून, वाकडेवाडी बसस्थानकातून 80 बस सोडण्यात आल्या आहेत. दीपावलीसाठी गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची कोणत्यादी प्रकारची गैरसोई होऊ नये, म्हणून विशेष नियोजन केले आहे. तसेच, जादा बसेसप्रमाणे नियोजित बसेसदेखील मार्गांवर धावणार आहेत.