

पिंपरी : नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमजवळील भंगार साहित्याच्या गोदामाला मंगळवारी (दि.14) सकाळी सहाच्या सुमारास अचानक आग लागली. त्यात अतिक्रमण विभागाने जप्त केलेले बोर्ड, टपऱ्या, कपाट,नामफलक, हातगाड्या, फलक, लाकडी व लोखंडी साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले.(Latest Pimpri chinchwad News)
भंगार साहित्याच्या गोदामाला आग लागल्याची माहिती मिळाल्यावर तात्काळ अग्निशमन पथक घटनास्थळी पोहचले. अग्निशमन दलाच्या 10 बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, त्यात मोठ्या प्रमाणात जप्त केलेले साहित्य तसेच, भंगार साहित्य जळून खाक झाले.
उपअग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांनी सांगितले की, भंगार गोदामामध्ये लाकूड व प्लास्टिक असल्यामुळे आग झपाट्याने पसरत होती. अग्निशमन पथकांनी सर्व दिशांनी पाण्याचे फवारे मारून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमजवळील महापालिकेच्या भंगार गोदामास आग लागल्याने साहित्य जळून खाक झाले.