

पंकज खोले
पिंपरी: जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत नागरी सुविधा देण्याबरोबरच नव्या वर्षात नद्या स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करणे आणि दर्जेदार घरे देण्याचा संकल्प पीएमआरडीएने सोडला आहे. यासाठी सुमारे 4 हजार 424 कोटी रुपये खर्चाच्या योजना राबविण्यात येणार आहेत. या योजनांद्वारे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या नद्यांचे प्रदूषण हटवून त्या स्वच्छ-सुंदर करण्याबरोबरच ग््राामीण भागातही विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. या योजनांमुळे पीएमआरडीए क्षेत्राच्या विकासाला एक नवी दिशा मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) ने महानगर क्षेत्रातील नागरी जीवनमान उंचावण्यासाठी तसेच, सुनियोजित शहर विकासाच्या उद्दिष्टाने 4 हजार 424 कोटी रुपयांचे महत्त्वूपर्ण प्रकल्प हाती घेणार आहे. नागरिकांना आवश्यक नागरी सेवा आणि दर्जेदार गृहप्रकल्प उभे करणे. त्याचबरोबर नद्या प्रदूषणमुक्त करण्यासारखे महत्त्वाचे प्रकल्प सुरू केले जाणार आहेत.
पर्यावरण आणि जलसंपदा सुधारण्यासाठी नदीप्रदूषण नियंत्रण प्रकल्पांवर निधी खर्च करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने इंद्रायणी, पवना आणि मुळा, मुठा या तिन्ही नद्यांसाठी एकूण 1 कोटी 988 कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर असून, त्यापैकी इंद्रायणी आणि पवना नदी सुधारबाबतची कार्यवाही लवकरच सुरू केली जाणार आहे. यासोबतच चार भूमिगत सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी 300 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या योजनांसाठीच्या सर्व प्रक्रिया पार पडली असून, अंतिम निविदा प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांना घरे उपलब्ध व्हावीत, यासाठी 835 कोटी रुपयांचे गृहप्रकल्पदेखील अंतिम टप्प्यात आहेत. पुढील तीन ते चार महिन्यांत त्याबाबतची लॉटरी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. गृहप्रकल्पासाठी सेक्टर 12 येथील दुसऱ्या टप्प्यात 11.63 हेक्टर क्षेत्रात जवळपास साडेसहा हजार घरे उपलब्ध होणार आहेत. हा प्रकल्प पुढील वर्षापर्यंत पूर्ण होणार असून, त्यासंबंधित लॉटरी प्रक्रियादेखील राबविण्यात येणार आहे.
माण-म्हाळुंगे नगर योजनेसाठी 616 कोटी रुपये मंजूर असून, जवळपास 250 हेक्टर क्षेत्राचा पारुप योजना मसुदा तयार करण्यात आल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले. आणखी चार महत्त्वपूर्ण नगरयोजनांवर कार्यवाही सुरू आहे. भविष्यात शहरीकरणासाठी 15 एकात्मिक नगर वसाहतीच्या प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा तातडीने पूर्ण करण्यासाठी 162 कोटी रुपयांचे 11 अग्निशमन प्रकल्प आणि 69 कोटी रुपयांचे देहू घाट, फुटबॉल टर्फ, वाघोली हे जलपुरवठा प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.
पीएमआरडीएकडून विविध विभागातील सेवा या ऑनलाईन झाल्या आहेत. त्याचा आढावा घेण्यात येत आहे. प्रलंबित अर्ज, तक्रारी यादेखील लवकरच निकाली काढण्यात येतील. नव्या वर्षात 29 सेवांमुळे नागरिकांना विनाविलंब प्रमाणपत्र, मुंजरी लवकर मिळण्यास मदत होईल.
दीपक सिंगला, अतिरीक्त आयुक्त, पीएमआरडीए
पेपरलेस कारभाराकडे वाटचाल
येत्या वर्षात नागरिकांना सुलभ आणि गतिमान सेवा मिळण्यासाठी तब्बल 29 सेवा ऑनलाईनद्वारे सुरू करण्यात येणार आहे. नवे आणि वापरण्यास सोपे असे संकेतस्थळदेखील उपलब्ध केले जाणार आहे. यात विकास, परवानगी विभागातील 12 सेवा, जमीन व मालमत्ता विभागातील 3 तर, अग्निशमन विभागातील 4 सेवा या ऑनलाईन केल्या जाणार आहेत.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या गावांचा कायापालट करण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प आखले आहेत. त्याच अनुषंगाने नद्यां प्रदूषणमुक्त करण्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प येत्या काही दिवसांत मार्गी लागेल. तसेच, भूमिगत गटारांचेदेखील कामे प्रगतीपथावर आहेत. लवकरच हे प्रकल्प सुरू होतील.
डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए