

पिंपळे गुरव: पिंपळे गुरव परिसरातील अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा सृष्टी चौक सध्या अतिक्रमणाच्या समस्येत अडकला आहे. रस्त्यावरील चौकाच्या नेमक्या मध्यभागी हातगाडीवाले, पदपथावर बसलेले विक्रेते यांच्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. आधीच व्यापारी, विविध दुकाने, हॉटेल्स, पार्किंगची अपुरी व्यवस्था आणि रस्त्याची मर्यादित रुंदी यामुळे सृष्टी चौकातील वाहतूक दाट आहे. त्यातच हातगाड्यांचे वाढते अतिक्रमण ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.
स्थानिकांच्या मते गेल्या काही दिवसांपासून ऑफिस, शाळेच्या वेळेत आणि संध्याकाळच्या पिक अवर्समध्ये चौकात अक्षरशः कोंडीची परिस्थिती निर्माण होते. वाहनचालकांना छोट्याशा जागेतून वाहन काढावे लागत असल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो आणि वाहनांची रांग लागत आहे. दुचाकी, चारचाकी, रिक्षा अशा सर्व वाहनांना चौक पार करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. चौकामध्ये रिक्षा थांबा असल्याने वाहतूक कोंडीमध्ये आणखीनच भर पडते.
हातगाड्या रस्त्याच्या मध्यावर उभ्या राहिल्याने पादचाऱ्यांचाही जीव धोक्यात आला आहे. अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरूनच चालावे लागते. काही वेळा हातगाडीभोवती ग््रााहकांची गर्दी होत असल्याने अचानक रस्ता अरुंद होतो आणि अपघाताचा धोका वाढतो. अनेकदा किरकोळ स्वरूपाचे अपघात झाले आहेत. वाहतुकीच्या वाढत्या समस्येमुळे स्थानिक नागरिक, दुकानदार आणि वाहनचालकांमध्ये नाराजी वाढत आहे. सृष्टी चौक हा पिंपळे गुरवचा महत्वाचा चौक असून, रोज संध्याकाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असते. अशा ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी हातगाड्या उभ्या राहिल्या तर वाहतूककोंडी होणारच. अतिक्रमण विभाग आणि वाहतूक पोलिसांनी तातडीने कारवाई केली नाही, तर मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
अतिक्रमण विभागाने पूर्वी काही अंशी कारवाई केल्याचे सांगितले जाते. मात्र, काही दिवसांनी पुन्हा त्याच जागी हातगाड्या उभ्या राहतात. त्यामुळे कारवाई केवळ तात्पुरती न ठेवता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. नियमित गस्त अतिक्रमणावरील कठोर कारवाई व्यावसायिकांना पर्यायी जागेची उपलब्धता आणि चौकात शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्था यांसारखे उपाय तातडीने राबवावेत असे स्थानिकांचे मत आहे. नागरिकांनी रस्ते मोकळे करून सुरक्षित वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य द्यावे व अतिक्रमणविरोधी पथकाने त्वरित कारवाई करून रहदारी सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
पादचारी म्हणून आम्हाला सर्वात जास्त त्रास होतो. पदपथ, रस्ता अडवल्याने आम्हाला जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागत आहे. हातगाड्या काढून टाका असे नाही पण त्यांना योग्य जागा द्या रस्त्याच्या मध्यभागी व्यवसाय केल्याने सर्वांना त्रास होतो.
स्थानिक नागरिक
सृष्टी चौक परिसरातील अतिक्रमण काढण्याबाबत आम्ही वेळोवेळी अतिक्रमण विभागाशी पत्र व्यवहार करत आहोत. रस्त्यावर कोणीही अनधिकृतरित्या अतिक्रमण केले असल्यास अतिक्रमण तात्काळ हटविण्यात येईल.
सुदाम पाचोरकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सांगवी विभाग
सृष्टी चौक परिसरातील अतिक्रमणाची माहिती मिळताच आमचे पथक संबंधित ठिकाणी तपासण्यासाठी पाठविले जाते. नागरिकांच्या तक्रारीवर तात्काळ कार्यवाही करून अतिक्रमण हटविले जाते.
डी. आटकोरे, बीटनिरीक्षक, अतिक्रमण विभाग